शिवरायांमुळेच लोकशाही अस्तित्वात आली! खासदार उदयनराजे यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यकारभारात लोकांचा सहभाग असायला हवा, असा त्याकाळी विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील एकमेव राजे होते. त्यामुळे येथे लोकशाही अस्तित्वात आली. राजेशाही अस्तित्वात ठेवावी असे महाराजांना वाटले असते, तर या देशात अजूनही राजेशाहीच असती, असे खासदार उदयनराजे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र पहिले शाहू महाराज यांच्या 273 व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उदयनराजे बोलत होते. यावेळी इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे उपस्थित होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने होत असलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्यांबद्दल खासदार उदयनराजे यांचा उद्वेग अद्याप कायम आहे. उदयनराजे म्हणाले, लोकांचा सहभाग राज्यकारभारात असायला हवा असा त्याकाळी विचार करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव राजे होते. त्यामुळे इथे लोकशाही अस्तित्वात आली. पण नंतर देशाची फाळणी झाली. आज जर आपण स्वतःला सावरलं नाही, तर या देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्रातही विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असे तुकडेही होतील. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर पडल्यामुळे आज ही परिस्थिती पाहायला मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

थोर पुरुषांनी आपले आयुष्य लोकांसाठी वेचले. असे असूनही वारंवार त्यांची बदनामी केली जात आहे. का कुणास ठाऊक, पण ही विकृती दिवसेंदिवस वाढतेय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारांचा विसर पडताना पाहायला मिळत आहे. हे एका दिवसात झालेले नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

 छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र पहिले शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवारी कृष्णा-वेण्णा संगमावरील त्यांच्या समाधीवर पुष्पांजली वाहून खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिवादन केले.