लोकशाही रक्षणाची लढाई आजपासून सुरू, उद्धव ठाकरे यांनी डागली तोफ

कोणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. जनतेसमोर हुकूमशहा कितीही मोठा असला तरी ज्यावेळेस ही जनता एकवटते तेव्हा हुकूमशहाचा अंत होतोच. आता ती वेळ आलीय.

लोकशाही रक्षणाची लढाई आजपासून सुरू होत आहे. भारतीय जनता पक्षाने कितीही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना तोडून मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊनच इंडिया आघाडी मैदानात उतरलीय असा खणखणीत इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावागावात जाऊन भाजपच्या हुकूमशाही राजवटीचा अंत करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत केल्याबद्दल राहुल गांधी यांचे अभिनंदन केले. याच मुंबईतून महात्मा गांधी यांनी इंग्रजांना चले जावचा इशारा दिला होता, आज हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी छत्रपती शिवाजी पार्क निवडले याबद्दल धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवतीर्थावरून जेव्हा रणशिंग फुंकले जाते आणि महाराष्ट्रातून, मुंबईतून एखादी गोष्ट जेव्हा बोलली जाते तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

भाजपा हा फुगा आहे, हवा आम्हीच भरली पण आता डोक्यात गेली

भाजपा म्हणजे एक फुगा आहे आणि त्या फुग्यात हवा भरण्याची चूक शिवसेनेने केली, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला. भाजपाकडे संपूर्ण देशात दोन खासदार होते, त्या फुग्यात शिवसेनेने हवा भरली, आता त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाने दिलेल्या 400 पारच्या नाऱयाचीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी खिल्ली उडवली. 400 पार म्हणजे काय फर्निचरचे दुकान आहे का? खुर्च्या बनवत आहात का? असे मिश्कील सवालही त्यांनी उपस्थित केले.

तुमचा परिवार आहेच कुठे?

इंडिया आघाडीची बैठक झाली तेव्हा ती विरोधकांची बैठक आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्याची आठवण करून देत उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आम्ही विरोधक असलो तरी हुकूमशाहीच्या विरोधातले आहोत. तुम्ही घराणेशाहीवर आरोप करता. तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची एवढाच परिवार आहे. बाकी परिवार आहे कुठे?’ असा खोचक सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

ही संविधान वाचवण्याची लढाई

इंडिया आघाडीची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी यावेळी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संविधानाबद्दल केलेल्या विधानाचा दाखला यावेळी दिला. न्यायालयात साक्ष देण्यापूर्वी धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतली जाते त्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घ्यायला लावा, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देश हाच आपला धर्म

व्यक्तीची ओळख ही देश असली पाहिजे, देशाची ओळख ही एक व्यक्ती होता कामा नये, असे ठामपणे सांगतानाच, देश हाच आपला धर्म असून देशाला वाचवा तरच आपण वाचू असे आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले. कुणी कितीही मोठा असला तरी देशापेक्षा मोठा कुणी नाही, असे ते म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी यांनी अनेक पक्षांची आघाडी असूनही सरकार उत्तम चालवले होते, त्यानंतर नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनीही चांगले सरकार चालवले, आता हुकूमशाही संपवून देशाला मजबूत सरकार हवे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.