उद्धव ठाकरे-फडणवीस यांनी साधला संवाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरोळ तालुक्यातील पूरस्थितीची पाहणी करून शाहूपुरी येथे पोहोचलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेत होते. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही याच ठिकाणी आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. पूरपरिस्थितीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याबाबत दोघांमध्ये बोलणे झाले.

यावेळी फडणवीसांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीदेखील उपस्थिती होती. या भेटीवरून चर्चा रंगल्या. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्री ठाकरे यांचा निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांचा अशा प्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो व ही भेट झाली. परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.

माझ्यासोबत तीन पक्ष आहेत, चौथा पक्षदेखील येईल!

फडणवीस भेटीबद्दल बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. यात कुठेही मला राजकारण करायचं नाहीये. यात त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील तर त्याचं स्वागतच करू. तिथे काही बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही. दरवाजेच नव्हते. सगळ्यांच्या घरात पाणीच घुसलं होतं तर दरवाजे का राहतायत. मी त्यांना सांगितलं की, पुन्हा मुंबईत आपण भेटू. ज्या सूचना असतील त्यांच्यावर एकमत होईल. माझ्यासोबत तीन पक्ष आहेतच. भाजप हा चौथा पक्षदेखील येईल. महाराष्ट्रातले हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर उद्या जे काही आपण निर्णय घेऊ, त्याच्या आड कुणीही येणार नाही.’