
राजकारणात सर्वप्रथम नीतिमत्ता अनिवार्य असते. पण सध्याच्या राजकारणात नीतिमत्ता हरवली असून देशात प्रचंड गोंधळाचे वातावरण आहे. देश कठीण प्रसंगातून जात आहे. त्यामुळे आता आपण चूक केली तर देशात हुकूमशाही येईल, असे परखड मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मांडले.
श्री जैन श्वेतांबर तेरापंथी सभा, तेरापंथ युवक परिषद, श्री जैन तेरापंथ ट्रस्ट, तेरापंथ महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कुर्ला येथे महाश्रमण समवसरण आध्यात्मिक प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळय़ाप्रसंगी उद्धव ठाकरे बोलत होते. सोहळय़ाच्या निमित्ताने त्यांनी प्रवचनकार युगप्रधान आचार्य श्री महाश्रमणजी यांचे आशीर्वाद घेतले. तसेच उपस्थित जैन बांधवांशी संवाद साधला. आचार्य महाश्रमणजी यांच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला. या ठिकाणी आपण मते मागण्यासाठी आलो नसल्याचे नमूद करत आपला आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मला कोणत्याही पदाची लालसा नाही. मला माझ्या आईवडिलांना अभिमान वाटेल असा मुलगा बनायचे आहे. तेच मी कर्तव्य मानतो, असेही ते म्हणाले.
देशाचे स्वातंत्र्य वाचवण्यासाठी साथ द्या!
राजकारण हे एक समाजसेवेचे साधन आहे. अहिंसा, नैतिकता, समाजकार्य अशी राजकारणाची मूल्ये आहेत. मात्र सध्याच्या राजकारणात नीतिमत्ता कुठेही दिसत नाही. संपूर्ण देश संभ्रमित अवस्थेत आहे. जीएसटीसह अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. भारतमातेचे स्वातंत्र धोक्यात आहे. नीतिमत्ता, सद्भावना कुठेही दिसत नाही. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्य टिकवण्यासाठी दारात आलेल्या हुकूमशाहीला आपल्याला रोखावे लागेल आणि त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे आवाहनही त्यांनी या सोहळय़ाप्रसंगी केले.

























































