उद्धव ठाकरे यांच्या हस्ते निवडणूकीचा फॉर्म स्वीकारताना एकनाथ शिंदे यांचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी फटकारले

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना पक्षासंदर्भात दिलेला निर्णय हा बेकायदेशीर असल्याचे अनेक पुरावे दररोज समोर येत आहेत. राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची 2018 मधली घटना दुरुस्ती मान्य नसल्याचा निकाल दिला आहे. मात्र हा निर्णय किती चुकीचा असल्याचे सिद्ध करणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

2019 साली विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. तसाच एबी फ़ॉर्म एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आला होता व त्यानंतर शिंदे यांनी सोशल मीडियावरून त्याचे फोटो शेअर करून उद्धव ठाकरे यांचे आभार मानले होते. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर आता नेटकऱ्यांनी मिंधे गटाला फटकारले आहे.

राहुल नार्वेकर यांना 2018 ची घटना मान्य नाही मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला निवडणूकीचा एबी फॉर्म मान्य आहे, अशी टीका काही नेटकऱ्यांनी केली आहे.

अंबादास दानवे यांनीही फटकारले

एकनाथ शिंदे यांनी केलेले ते ट्विट शेअर करत विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील टीका केली आहे. ”मुख्यमंत्री शिंदे यांना 2019 साली विधानसभेचा एबी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती, घराणेशाही, एकधिकारशाही वगैरे वगैरे तुम्हाला दिसली नव्हती. हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे.