शरयू काठ भारावला, उद्धव ठाकरेंचे आरतीपूर्वी अभूतपूर्व स्वागत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्रीरंग खरे । अयोध्या

सम्मान समारोह आणि आशीर्वादोत्सव कार्यक्रम संपल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शरयू तीराकडे रवाना झाले. एखाद्या योध्याचे जसे स्वागत होते तसेच स्वागत त्यांचे शरयू घाटावर करण्यात आले. घाटाकडे जाण्यासाठीच्या पायऱ्यांवर फुलांच्या पाकळ्यांची पखरण करण्यात आली होती. आरतीस्थळापर्यंत जाण्यासाठीच्या मार्गावर लांबलचक गालिचा अंथरला होता संपूर्ण शरयू घाट भगव्या रंगाच्या झेंडू फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता.

उद्धव ठाकरे यांच्या आगमनापूर्वीच देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले रामभक्त, वारकरी, शिवसैनिक हा सोहळा डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी मिळेल तिथे जागा पकडून बसले होते. उद्धव ठाकरेंचे जेव्हा सहकुटुंब आगमन झाले तेव्हा वातावरण हे अत्यंत जबरदस्त झाले होते. ‘जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी’ या घोषणांसह ‘जय श्रीराम’चाही जयघोष सातत्याने सुरू होता.

उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिले शरयू पूजन करण्यात आले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरतीला सुरुवात केली. आरतीमध्ये काठावर हजर असलेले सगळे जण सहभागी झाले होते. त्याचवेळी दुसऱ्या काठावर आकर्षक आतषबाजीला सुरुवात झाली होती. विविधरंगांचे आकर्षक दिवे यावेळी पाणी सोडण्यात आले.

आरती करणाऱ्या पुजाऱ्यांची एका सुरात सुरू असलेली आरती, आरतीपूर्वी ओवाळण्यात आलेल्या उदबत्त्यांचा मंद, मनमहक सुगंध हे वातावरण तिथे उपस्थित असलेला प्रत्येक जण डोळ्यात साठवून ठेवण्याचा पेरयत्वयन करत होता. आरती संपवून उद्धव ठाकरे जेव्हा शरयू काठावरून रवाना झाले तेव्हा ‘जय जय श्रीराम’च्या घोषणांनी पुन्हा एकदा आसमंत दुमदुमून गेला.

या आरती सोहळ्याला उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याची संपूर्ण धुरा सांभाळणारे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार संजय जाधव केंद्रीय मंत्री अनंत गीते, राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.