करा… मुंबई पालिकेची चौकशी, पण नागपूर, ठाणे आणि पीएम केअर फंडाचीही चौकशी करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणपतीच्या दिवसांत नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास- पुरुषांचीसुद्धा चौकशी व्हायला हवी. नागपूर बुडत असताना मुंबईत मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने बॉलीवूड तारकांसोबत फोटो काढून घेण्यात व्यस्त होते. त्यांची आणि ठाणे पालिकेचीही चौकशी करा.

मुंबई महापालिकेतील 25 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश मिंधे सरकारने दिले आहेत. त्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सरकारला घेरले. खुशाल करा मुंबई महापालिकेची चौकशी, पण तशीच चौकशी नागपूर, ठाणे महापालिका आणि पीएम केअर फंडाचीही करा, असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी दिले.

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, माजी मंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधानसभेतील गटनेते अजय चौधरी, मुख्य प्रतोद सुनील प्रभू, विधान परिषदेतील गटनेते अॅड. अनिल परब यांच्यासह शिवसेनेचे सर्व आमदारही उपस्थित होते.

पुढील महिन्यात अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आहे. त्यासाठी पेंद्र सरकारकडून निमंत्रण आले का, असे माध्यमांनी विचारले असता, मला कुणाचे आमंत्रण आले तरी मी तिकडे जाईन असे नाही, श्रीराम माझेसुद्धा आहेत. मला श्रीराम सांगतील तेव्हा मी जाईन, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. भाजपवरही त्यांनी निशाणा साधला. ते पुढे म्हणाले की, ‘अयोध्येतील राम मंदिराला शिवसेनेचे समर्थन होते. त्यासाठी आम्ही पक्षनिधी दिला. प्रभू श्रीराम कुण्या एकाची मक्तेदारी नाही. भाजपचे नशीब आहे की ते सध्या सत्तेत असल्याने उद्घाटन करताहेत. बाबरी पाडण्यात त्यांचा सहभागही नव्हता. त्यानंतर 92-93 च्या हिंसाचारात मुंबई वाचवण्यातही भाजपचा सहभाग नव्हता. मंदिरासाठी विशेष कायदा बनवा, असे मी सांगत होतो. नोव्हेंबर 2018 मध्ये अयोध्येला गेलो होतो. त्यानंतर योगायोगाने वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. नोव्हेंबरमध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतरही तिकडे गेलो होतो.

मिंध्यांचे बाळासाहेबांबद्दलचे प्रेम बनावट,अनिल परब यांनी बुरखाच फाडला

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमदार अपात्रता सुनावणीवेळी आज हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केले. त्यासंदर्भात माध्यमांनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. त्या प्रश्नाला उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आमदार अॅड. अनिल परब यांनी उत्तर दिले. दीपक केसरकर यांनी बाळासाहेबांबद्दल आज सुनावणीवेळी जे उद्गार काढले हे अत्यंत संतापजनक होते. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातो आहोत असे सांगत त्यांनी गद्दारी केली आणि आता उलटतपासणीवेळी बाळासाहेबांवर बेछूट आरोप केले. बाळासाहेबांचे निधन 2012 मध्ये झाले. त्यानंतर दोन वर्षांनी अर्थात 2014 मध्ये दीपक केसरकर शिवसेनेत आले. तेच आज बाळासाहेबांबद्दल आम्हाला शिकवून गेले. शिवसेनेत बाळासाहेब मनमानी करायचे, सेनेत निवडणुका होत नाही, लोकशाही पाळली जात नाही, असे ते म्हणाले. त्यावरून बाळासाहेबांचे नाव घेऊन सत्तेत येणाऱ्या शिंदे गटाचे खरे स्वरूप उघडकीला आले आहे. त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले ते लक्षात घेता त्यांचं बाळासाहेबांबद्दलचे प्रेम बनावट आहे. त्यांना बाळासाहेबांबद्दल कोणतेही प्रेम नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी ते गेले हे आता सिद्ध होत आहे’, असे अनिल परब म्हणाले.

प्रफुल्ल पटेलांकडे जेवायला जाणार आहे. त्यांना सांगणार की ‘मिर्ची’कम जेवण द्या!

भुजबळांसारखी जडीबुटी सर्वांना मिळो

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सदनमधील भ्रष्टाचारप्रकरणी ईडीने दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. त्याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. माध्यमांनी यासंदर्भात उद्धव ठाकरे यांना विचारले असता, ‘भुजबळांना अशी कोणती जडीबुटी भेटली, कोणता साधूबाबा भेटला की त्यांच्याविरोधातील ईडी मागे झाली आणि ईडीने सांगितलं की, आम्ही कशासाठी केस केली होती तेच माहीत नाही. ही जडीबुटी देवा सगळय़ांना दे अशी प्रार्थना’, असा टोला त्यांनी लगावला. मी आता भुजबळांकडे पेढा खायला जाणार आहे, अशी मिश्किलीही त्यांनी केली. त्यानंतर माध्यमांनी प्रफुल्ल पटेलांचे काय असे विचारले असता, पटेलांकडे जेवायलाच जाईन, त्यांना कमी मिर्ची असलेले जेवण करायला सांगेन, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

‘वाटेल तेव्हा वाटेल त्याला बदनाम करायचे आणि भाजपच्या अखत्यारीत आल्यानंतर त्यांच्यावरच्या केस मागे घ्यायच्या, एवढे उघड उघड हे थोतांड सुरू आहे. असे थोतांड असलेले हिंदुत्व मानायला मी तयार नाही’, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही शरसंधान केले.

शिक्षणमंत्र्यांचे शिक्षण कमी पडले

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या बेछूट आरोपांवरून सर्वत्र संताप होत आहे. ही बाब माध्यमांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास यावेळी आणून दिली. त्यावर ‘आम्ही पक्षांतर्गत निवडणुकांशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. मुळात ते शालेय शिक्षणमंत्री असले तरी त्यांचे शिक्षण झालेले नव्हते, मूलभूत शिक्षण झालेले नव्हते’, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. ‘बाळासाहेब ठाकरे असताना हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते, मग आज यांना काय साक्षात्कार झाला, असा खणखणीत सवालही त्यांनी केला.

खोटेनाटे आरोप कराल तर याद राखा

आमदार अपात्रता सुनावणीत होत असलेले आरोप तसेच मिंधे सरकारकडून सुरू झालेल्या एसआयटी चौकशीसत्रांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. आमच्यावर खोटेनाटे आरोप कराल तर याद राखा, खरी माहिती आमच्याकडे आहे. तीही ऑन रेकॉर्ड. ती सारी माहिती उघड केली तर अनेक लोक उघडे होतील, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी केला.

31 डिसेंबरला दिल्लीहून येणाऱ्या आदेशानुसार निकाल लागेल!

आमदार अपात्रता सुनावणीचा निर्णय 31 डिसेंबरपर्यंत लागणार आहे. निर्णय कोणाच्या बाजूने लागेल असे यावेळी माध्यमांनी विचारले असता, ‘वरून’ जो निर्णय येईल तोच असेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याची एसआयटी चौकशी करा

मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्याबाबत माध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, 8 दिवसांपूर्वी आनंद निरगुडे यांनी राजीनामा दिला होता, मात्र ही बाब सरकारने लपवून ठेवली. त्यांच्यावर कोणत्या दोन मंत्र्यांचा दबाव होता, त्यांच्या राजीनाम्यात नेमके काय दडलेय हे पुढे यायलाच हवे. त्यासाठी याप्रकरणी एसआयटी चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.