मोदींची स्वप्न पूर्ण करण्याची भाजपची लायकी नाही म्हणून पक्ष फोडतात, उद्धव ठाकरेंचे आसूड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेली दहा वर्षं मोदी स्वप्न बघताहेत. पण, ती स्वप्न पूर्ण करण्याची लायकी आणि कर्तृत्व भाजपकडे नाही. म्हणून त्यांना पक्ष फोडावे लागतात, असा सणसणीत आसूड शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीरामपूर येथील सभेत ओढला.

अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावरून भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आता कोरोना नसला तरी एक व्हायरस सध्या देशात फैलावतोय. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा व्हायरस आहे. तो एक नियम कोरोनासाठी होता, मास्क लावा, हात धुवा आणि दोन हात लांब राहा. तसं या हुकूमशाहीच्या व्हायरस पासून दोन हात लांब राहा आणि हात धुऊन त्यांच्या मागे लागा कारण आपल्याला त्यांना महाराष्ट्रातून संपवून टाकायचं आहे. भाजप आणि संघाचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, त्यांना आज एक मोठा धक्का बसलेला आहे. नेहमी म्हणतात की शिवसेनेतून कुणी गेला तर शिवसेनेला धक्का, काँग्रेसमधून गेला की काँग्रेसला धक्का, राष्ट्रवादीतून गेला की राष्ट्रवादीला धक्का… पण हे धक्के भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. ज्यांच्याविरुद्ध लढले, भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले, मग एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आला की हा भाजपला मोठा धक्का आहे. महाविकास आघाडीला किंवा शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला नाही. कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आली आहे. शिवसेनेला आता धक्क्यांची सवय झालेली आहे. असे अनेक आले आणि अनेक गेले. पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी फुटते, कोंब फुटतात तसा शिवसेनेचा वृक्ष हिरवागार होऊन जातो. निसर्गाच्या नियमात पानगळ ही असतेच. त्यामुळे सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत. ती झडताहेत आणि नवीन धुमारे फुटलेले आहेत. सध्या भाजपच्या नेत्यांच्या माध्यमांसमोर कशी त्रेधातिरपीट उडतेय. एक दिव्य नेते, ज्यांचं नाव घेण्याच्या लायकीचे ते नाहीत, त्यांना अशोक चव्हाणांच्या पक्षप्रवेशाविषयी विचारलं की, फडणवीसांनी यांचा उल्लेख डीलर म्हणून केला होता. आता तुम्ही डीलरला लीडर केलंत का, असं करता करत आदर्शबद्दल विचारलं तेव्हा ते तुला उत्तर देणार नाही म्हणाले. म्हणजे काय, जनता तुम्हाला विचारतेय. कारण, भ्रष्टाचाऱ्यांना स्थान नाही हे तुम्हीच सांगितलं होतं. मला आता मोदीजींना विचारायचं आहे की, मोदी जी तुम्ही जो काही डांगोरा पिटताय की मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी.. मग तुमची गॅरंटी हीच आहे का? आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू, तुम्ही कितीही मोठा भ्रष्टाचार करा, पण भाजपमध्ये आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल. उपमुख्यमंत्री पद मिळेल, मुख्यमंत्री पद मिळेल, ईडी-इन्कमटॅक्स-सीबीआय तुमच्याकडे येणार नाही, ही मोदी गॅरंटी आहे. शेतकऱ्याचा जो आक्रोश सुरू आहे, मग माझ्या शेतकऱ्याला गॅरंटी कोण देणार, असा रोखठोक सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.

‘मध्यंतरी मी शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावर तिथे संपूर्ण पिकं सुकून गेल्याचं पाहिलं होतं. तेव्हा तिथे शेतकऱ्यांनी विचारलं की उद्धव जी आम्ही खायचं काय? आपल्याकडे शहरात दुकानात धान्य मिळतं. पण, ते धान्य शेतकरी घाम गाळून रक्त आटवून मातीतून जे सोनं पिकवतो, त्यातून तयार होतं आणि आपल्याला मिळतं. म्हणून आपण जगू शकतो. जो आपल्याला जगवतो, तो शेतकरी मला विचारत होता की आम्ही खायचं काय, कारण आमच्या डोक्यावर कर्ज आहे. शेती, घर, बैलजोडी गहाण टाकलं आहे. काही वेळा तर मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळ येते. पूर्वी तर असेही फोटो मी पाहिलेत की बैल सुद्धा गहाण टाकल्यानंतर नांगराला शेतकरी किंवा त्याची पत्नी ती जुंपून घेऊन शेत नांगरतेय. दोन दिवसांपूर्वी नांदेड परिसरात अवकाळीचा फटका बसला. मग अशोक चव्हाणांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवं होतं, की मोदींच्या दारात जायला हवं होतं? पण हे गेले मोदींच्या दारात.’ अशी घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.

‘आता मी टीव्हीवर पत्रकार परिषदेत पाहिलं की, ते सांगत होते, मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते भाजपमध्ये गेले. अहो आम्ही ऐकलं मोदी फक्त तीनच तास झोपतात. तीन तासांत त्यांना स्वप्न पडतात कधी आणि ती तुम्हाला कळतात कशी. ज्याचं स्वप्न त्याने पूर्ण केलं पाहिजे. त्यांची स्वप्न तुमच्या स्वप्नात कशी येतात. इंदापूरचे हर्षवर्धन पाटील यांचं दोन वर्षांपूर्वीचं भाष्य आहे, की मी भाजपात आलो, आता ईडीबिडी काही नाही आता चांगली झोप लागते. आता माझा विचार आहे की कधी अशोकरावांना फोन केला तर विचारावं की जागे आहात की झोपलात. मध्यंतरी त्यांची झोप उडाली होती. आता झोपण्यासाठी भाजपमध्ये गेले आहेत. मुद्दा हा आहे की गेले दहा वर्षं स्वप्न कोण बघतंय, मोदीजी. मोदींचं स्वप्न दहा वर्षं झाली तर पूर्ण होता होत नाहीत. मग त्यांनाही मला विचारायचं आहे की, तुमचं स्वप्न पूर्ण करायला भाजप पुरेसा नाही का, भाजपची ताकद नाही का की तुमचं स्वप्न पूर्ण करावं, म्हणून दुसऱ्यांचे पक्ष फोडताय का? आमच्या नेत्याला स्वप्न पडताहेत, आम्ही नालायक लोकं आहोत, तू ये म्हणजे यांचं स्वप्न पूर्ण होईल. हा असा नाकर्तेपणा सुरू आहे. तुमचा नेता स्वप्न बघतोय पण माझ्या शेतकऱ्याची झोप उडाली आहे. तो झोपू शकत नाही, स्वप्न तर दूरच राहिलं. त्याच्या दारावर सावकार येतो, बँका येतात. जप्तीची नोटीस लावलेली आहे, तो आत्महत्या करतोय. त्याचं घर कोण सांभाळणार? तुमच्या नेत्याची स्वप्न पूर्ण करायची म्हणून आणि भाजपची लायकी, कर्तृत्व नाही म्हणून दुसऱ्याचे पक्ष फोडावे लागतात, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर आसूड ओढला.