तेव्हा अमित शहांनीच फडणवीसांना खोलीबाहेर काढलं होतं! उद्धव ठाकरेंचे जोरदार प्रत्युत्तर

ज्या खोलीला आम्ही मंदीर मानतो, त्या बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहा नाक रगडायला आले होते आणि त्यांनी तुम्हाला मात्र खोलीबाहेरच ठेवलं होतं. तेव्हा फडणवीस जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा, अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अँटॉप हिल येथे झालेल्या जनसंवाद सभेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे-फडणवीस सरकारवर आसुड ओढले. उपस्थितांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजची ही सभा आपल्या निवडणुकीच्या विजयासाठी आहे. प्रचारासाठी मी म्हणणारच नाही. लढत कुणामध्ये आहे, हा प्रश्न कुणी विचारला तर तुम्ही सांगायला पाहिजे की एका बाजूला आपल्या आईवरती वार करणारा आणि दुसऱ्या बाजूला तुमच्यावरच्या अन्यायाचे वार छातीवर घेणारा अनिल देसाई. हा मुख्य फरक आहेत. एकिकडे ज्या आईने राजकारणातल्या आयुष्याला जन्म दिला त्या आईच्या कुशीवर वार केला. जो आईचा होऊ शकला नाही, तो तुमचा काय होणार? तो नुसता गद्दार नाही, आईवर वार करणारी औलाद आहे. आता त्याने काहीही देऊ द्या. श्रीखंड देईल, दूध देईल. त्याला म्हणावं तू गद्दारीचं शेण खाल्लं आणि आता श्रीखंड वाटतोयस?, असा रोखठोक सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

फडणवीसांवर ठाकरे शैलीत फटकारे लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज एक्सप्रेसमध्ये मुलाखत दिली. त्यात मला विचारलं की, अडीच-अडीच वर्षांचं ठरलं होतं का? मी म्हणालो की, ठरलंच होतं. मातोश्रीवर जिथे बाळासाहेबांची खोली आहे, तिथे मी आणि अमित शहा यांनी बसवून ठरवलं होतं. मी माझ्या आईवडिलांची, तुळजाभवानीची शपथ घेऊन मी बोललो. साधारणतः पुलवामा हल्ल्याच्या आसपास अमित शहा आले होते. तेव्हा मी त्यांना अडीच-अडीच वर्षांचं बोललो होतो. ते त्यावेळी ठीक आहे असं म्हणाले होते. त्यानंतर लोकसभा निवडणुका होत्या, त्यानंतर काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका झाल्या. मला देवेंद्रंनी नेहमीप्रमाणे कोपराला गूळ लावत विचारलं की, मी आदित्यला चांगला तयार करतो. मग अडीच वर्षांनी त्याला मुख्यमंत्री करू. मी म्हणालो, तो अजून लहान आहे. आमदार म्हणून कारकिर्द सुरू करतोय. तुम्ही त्याला तयार नक्की करा, पण लगेच मुख्यमंत्री पद वगैरे लगेच डोक्यात घालू नका. मी म्हणालो की तुम्ही ज्येष्ठ नेते आदित्यच्या हाताखाली काम करणार का? तेव्हा त्यांनी दिल्लीत जाऊन अर्थमंत्री होण्याचं बोलून दाखवलं होतं. या तपशीलात मी खोलवर जात नाही. पण आज तेच फडणवीस चरफडले. मी त्यांचं बिंग फोडलं म्हणून मला भ्रमिष्ट म्हणाले. मी भ्रमिष्ट आहे की नाही, ते लोक ठरवतील. पण तुमची हालत आज वाईट झाली आहे. आधी म्हणाले अमित शहांना खोलीत घेऊन गेले मग म्हणाले देवेंद्रंनी शब्द दिला. अहो, फडणवीस जनाची नाही तर किमान मनाची ठेवा. लाज सोडलेला कोडगा माणूस आहात हे आम्हाला माहीत आहे. ज्याला तुम्ही कुठली तरी खोली म्हणताय, ती खोली आम्ही मंदिर मानतो कारण ती बाळासाहेबांची खोली आहे. त्याच खोलीत बाळासाहेबांच्या फोटोसमोर अमित शहा नाक रगडायला आले होते. त्या खोलीतूनच तुम्हाला अमित शहांनी तुम्हाला नो एन्ट्री केली आणि बाहेर बस सांगितलं होतं. ज्या खोलीत अटलजी, आडवाणीजी आले होते, त्यातून तुम्हाला बाहेर बसवलं होतं, अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

दिल्लीकरांपुढे झुकून मुंबई लूट करण्याच्या मिंधे सरकारच्या धोरणावरही त्यांनी कडाडून टीका केली. ‘मुंबईची असुया वाटते म्हणूनच मुंबई महापालिकेची लूट सुरू आहे. 2012 सालापर्यंत पालिका 640 कोटींच्या तोट्यात होती. पण आत्तापर्यंत म्हणजे विसर्जित होईपर्यंत 90 हजार कोटींपर्यंतच्या ठेवी आपण ठेवल्या होत्या. आता हा काँट्रॅक्टरचा कारभार सुरू आहे. रस्त्याची कामं काढताहेत आणखीन कसली काढताहेत. पण आता परिस्थिती अशी निर्माण होईल की विकासकामं तर ठप्प होतील पण मुंबईच्या सफाई कामगारांना द्यायला देखील पालिकेकडे पैसा शिल्लक राहणार नाही. सगळा मिंधे, शहा, मोदींच्या मित्र कॉन्ट्रॅक्टरांनी लुटलेली मुंबई असेल. भिकेला लावलेली मुंबई असेल. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार असलेली मुंबई तुम्ही खतम करताय. आज बेस्टच्या कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत, पण एमएमआरडीए करदात्यांच्या पैशातले 3 हजार कोटी रुपये उचलून मुंबई मेट्रोचं काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या उरावर घालतेय. हे राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे. जर हे मिंधे सरकार त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या एमएमआरडीएच्या माध्यमातून पालिकेची तिजोरी लुटत असेल तर आमचं सरकार एमएमआरडीएच रद्द करू किंवा कार्यकक्षा पालिकेच्या पलिकडे टाकून देऊ.’