गोमांसाच्या कत्तलखान्यांकडून निवडणूक रोखे घेणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, उद्धव ठाकरेंचा घणाघात

शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणणारे लोक गोमांसाचे कत्तलखाने चालवणाऱ्यांकडून निवडणूक रोखे घेतात. असल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. कारण, असल्या थोतांडाला जनता निवडणुकीत कापल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

बुलढाण्यातील मेहकर येथे झालेल्या जनसंवाद सभेत त्यांनी भाजपच्या दुतोंडीपणावर आसूड ओढले. ‘भाडोत्री जनता पक्षात गेलेले मिंधे, अजित पवार यांना पैसे देऊन माणसं बोलवावी लागतात, तरी माणसं जमत नाहीत. बिर्याणीची सोय करावी लागते, लोकं येऊन बिर्याणी खातात आणि रिकाम्या खुर्च्यांसमोर भाषण करून हे पण बिर्याणी खायला निघून जातात. गद्दारांच्या अवलादी शिवसैनिकांवरती केसेस टाकताहेत. म्हणजेच यांच्यात काय दम नाही, ताकद नाही. हे नुसतेच गद्दार नाहीत, तर नामर्द आहेत. तुम्ही मर्दांची अवलाद असाल मी शिवसैनिकांना घेऊन येतो, तुमचे भाडोत्री गुंड घेऊन या, पोलिसांना बाजूला ठेवा आणि होऊ जाऊ दे. मी बाजूला बघून तुमची मॅच बघणार नाही, मी मॅच खेळून जिंकवणार. मी म्हणजे काही अमित शहांचा मुलगा नाही तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पुत्र आहे. अमित शहा म्हणाले की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली पण मी म्हणतो की अमित शहा तुमच्या पुत्रप्रेमामुळे हिंदुस्थान क्रिकेट फायनल हरला. पण, ज्याला काहीही पडलेली नाही क्रिकेटशी काहीही संबंध नाही, अशा पोराला तुमची मस्ती म्हणून तुम्ही गृहमंत्री आहात म्हणून फोन करून क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष केला. त्याने मुंबईत होऊ घातलेला सामना गुजरातमध्ये नेला आणि आपण हरलो असं लोकं म्हणताहेत.’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

जिजाऊंना घातलं साकडं

उद्धव ठाकरे यांनी सिंदखेडराजा येथील सभेपूर्वी जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्याचा उल्लेख करत ते म्हणाले, ‘सिंदखेडराजा हे मातृतीर्थ आहे, तिथे जाऊन आशीर्वाद घेतले आणि तिथे जे मागितलं ते आता सांगतो. मी हात जोडून इतकंच सांगितलं की, जसं तू त्या वेळेला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारं तेज जन्माला घातलं. ते जर जन्माला आलं नसतं आणि तू त्याला तसं घडवलं नसतं तर आमच्यापैकी कोण शिल्लक राहिलं असतं आम्हाला माहीत नाही. आणि जिजाऊंना गाऱ्हाणं घातलं की हा तोच महाराष्ट्र आहे, ज्याला लुटलं जातंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती आणि सूरतवाले महाराष्ट्र लुटताहेत. या संघर्षात मावळ्यांच्या यशासाठी तुझे आशीर्वाद दे. मावळ्यांमध्ये शिवाजी महाराजांचं तेज अवतरू दे. प्रत्येकाच्या मतांमध्ये महाराजांची भवानी तलवार अवतरू दे, हे साकडं मी जिजाऊंना घातलं आहे. ‘ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

यावेळी एखाद्या निष्ठावंताने कसं असावं, याचं उदाहरणही त्यांनी शिवचरित्रातील एका प्रसंगाचा उल्लेख करत दिलं. ते म्हणाले, शिवाजी महाराज हैदराबादमध्ये कुतुबशहाच्या भेटीला गेले होते, ती घटना लक्षात ठेवण्यासाठी आहे. महाराजांना कुतुबशहा त्याचं वैभव दाखवत होता, मुद्दामहून खिजवण्यासाठी घोडदळ किती, हत्ती किती, सैनिक किती ते दाखवत होता. महाराज अचंबित झाले, ते म्हणाले काय प्रचंड हत्ती आहे.. कुतुबशहा खुश झाला. तो म्हणाला की, तुमच्याकडे असे हत्ती नाहीत? हा हत्ती किती जणांना भारी पडतो. पण तुमच्या सैन्यात हत्ती कसा दिसत नाही? तेव्हा महाराज म्हणाले की, माझ्याकडे हत्ती नाहीत. पण हत्तीचे तुल्यबळ असलेले, प्रसंगी हत्तीशी मुकाबला करणारे मावळे माझ्याकडे आहेत. कुतुबशहाला ते खोटं वाटलं. त्याने म्हटलं की मग हत्तीसोबत तुमच्या मावळ्यांचा मुकाबला होऊन जाऊ द्या. महाराजांनी होकार दिला आणि बाजूला बघितलं. त्यांच्या बाजुला होते येसाजी कंक. काटक शरीराच्या येसाजींनी तो इशारा हेरला आणि ते पुढे सरसावले. त्यांनी हत्तीला चिथवलं. हत्ती चवताळून त्यांच्या अंगावर आला. सगळ्यांचे श्वास रोखले गेले. पण महाराज शांत होते. चवताळलेल्या हत्तीसमोर परजलेली तलवार घेऊन येसाजी उभे होते. त्यांनी एकाच वारात हत्तीची सोंड मुळापासून वेगळी केली. त्यामुळे हत्ती चित्कारत परत निघून गेला. येसाजी कंक तरीही शांतपणे तलवारीवरचं रक्त पुसत महाराजांच्या बाजूला येऊन उभे राहिले. कुतुबशहाला हे आक्रित घडल्यासारखं वाटलं. त्याने येसाजींना बोलवून बक्षीस दिलं पण येसाजींनी ते नाकारलं. ते म्हणाले महाराज मला जे देतात ते पुरेसं आहे. मला तुमचं बक्षीस नको. हा विचार आता आपण विसरून गेलो आहोत, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी यावेळी काढले.

भाजपच्या ढोंगी हिंदुत्वालाही त्यांनी झोडपून काढले. ‘इतर वेळेला हे लोक उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं म्हणतात. पण, गोमांसाचे कत्तलखाने चालवणाऱ्या कंपन्यांकडून तुम्ही निवडणूक रोखे घेऊन जर तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार असाल तर या निवडणुकीत जनता तुम्हाला कापणार नाही तर कुणाला कापणार? कापावंच लागेल. कारण हे थोतांड आहे. हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्यांचा आणि देशप्रेम म्हणणाऱ्यांचा इतिहास आम्ही काढू शकतो. कधीही स्वातंत्र्यलढ्यात भाजप काय, पण त्यांचे राजकीय बापजादे जनसंघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच नव्हते. मग तुमच्याकडून आम्ही काय शिकायचं? गद्दारी? शिवसेनेने अनेकांना आमदार- खासदार केलं आणि भाजपने अनेकांना गद्दार केलं’ अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी या सभेत केली.