
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज एच.एन. रिलायन्स रुग्णालयात सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याची माहिती हृदयरोगतज्ञ डॉ. अजित देसाई व स्पाईन सर्जन डॉ. शेखर भोजराज यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी बुधवारी रात्री एच.एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले. याविषयीची माहिती स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. दोन-तीन दिवस रुग्णालयातच राहून उपचार घेणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आज सर्व्हाइकल स्पाईन शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेदरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर होती व आता शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातील त्यांच्या कक्षात हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम आणि स्थिर असल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.































































