
जगभरात बलात्कार, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना आता आभासी जगातही मुली, महिला सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. भविष्यातील सर्वात मोठा आभासी प्लॅटफॉर्म म्हणून पाहिले जाणाऱ्या मेटावर्स या आभासी जगतात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या डिजिटल अवतारावर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ब्रिटनमध्ये घडली. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीनंतर पोलीसही चक्रावून गेले असून त्यांनी तातडीने तपासही सुरू केला. दरम्यान, मुलीला शारीरिक इजा झाली नसली तरी तिच्यावर प्रचंड मानसिक आघात झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मेटावर्स या आभासी जगतात डिजिटल अवतारात एकमेकांशी संवाद साधता येतो. जगभरातील लोकांचे डिजिटल अवतार येथे मुक्तसंचार करत असतात. येथे मित्र बनवता येतात, त्यांच्यासोबत फिरता येते, शॉपिंगही करता येते. वास्तविक जगात ज्या गोष्टी करता येतात त्या या आभासी जगतातही शक्य आहेत. याच मेटावर्समध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बलात्काराला बळी पडली. ही पीडित मुलगी व्हर्च्युअल व्हिडियो गेम खेळत होती. त्या वेळी पाच पुरुषांनी डिजिटल अवतारात संबंधित मुलीच्या डिजिटल अवतारावर बलात्कार केला.






























































