थकबाकीदारांच्या वसुलीची बंदूक 83 नगरसेवकांच्या खांद्यावर

28

सामना प्रतिनिधी । उल्हासनगर

‘अभय’ देऊनही थकबाकी भरण्यास उल्हासनगरवासीयांनी पाठ फिरवल्यामुळे आता प्रशासनाने वसुलीची बंदूक 83 नगरसेवकांच्या खांद्यावर ठेवली आहे. थकबाकी वसुलीची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून नगरसेवकांचेही नैतिक कर्तव्य असल्याचे बजावत उल्हासनगर पालिका प्रशासनाने त्यांच्या हाती प्रभागातील थकबाकीदारांच्या याद्या सोपवल्या आहेत. या थकबाकीदारांशी संपर्क साधून कर भरण्यासाठी नगरसेवकांनी जोर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे थकबाकी वसूल होईलच सोबत पालिकेच्या तिजोरीत शंभर कोटींपेक्षा जास्त कर जमा होण्यास मदत होईल, असा प्रशासनाने दावा केला आहे.

थकबाकी वसुलीसाठी उल्हासनगर पालिकेने धडक मोहीम उघडली आहे. त्यासाठी थकबाकीदारांना अभय योजना देण्यासोबत कर भरण्यास टाळाटाळ करणाऱयांवर जप्तीची कारवाई करण्यापर्यंत सर्व हातखंडे आजमावले जात आहेत. त्यानुसार 31 जानेवारीपर्यंत अभय योजनेंतर्गत थकबाकीवर शंभर टक्के व्याज माफ होणार आहे. पण या योजनेला बहुतांश मध्यमवर्गीय तसेच अल्प श्रीमंतांकडून प्रतिसाद मिळतो. तर लाखो रुपयांची थकबाकी असणारे करबुडवे या योजनेकडे पाठ फिरवत असल्याचा अनुभव पुन्हा आला आहे. करबुडव्यांनी 31 जानेवारीपर्यंत संपूर्ण थकबाकीची रक्कम भरली नाही तर फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या संपत्तीवर जप्तीची टाच आणली जाणार आहे. असा सज्जड इशारा उल्हासनगर पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी दिलेला आहे. या इशाऱयानंतरही तिजोरीत अपेक्षित थकबाकी जमा होत नसल्याने पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी वसुलीसाठी थेट नगरसेवकांना साद घातली आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने पालिका विक्रमी करवसुली करेल, असा विश्वास करनिर्धारक व संकलक विनायक फासे यांनी व्यक्त केला.

यादी जाहीर करा
शिवसेना नगरसेवकांच्या प्रभागातून कर वसुलीला चांगला प्रतिसाद मिळतो. पालिकेला मदत करण्यासाठी शिवसेनेचे नगरसेवक तयार आहेत. मात्र विकासकामांसाठी तिजोरी भरायची असेल तर करबुडव्यांच्या नावांची यादी जाहीर करा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण यांनी केली.

100 कोटींचे टार्गेट
कर भरणा जोमात होण्यासाठी पालिकेतील सर्व अधिकारी दररोज 10 मालमत्ताधारकांच्या घरी जात आहेत. आजपर्यंत जेमतेम 50 कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झालेले आहेत. मार्च महिन्यात वसुली क्लोज केली जात असल्याने हाती केवळ अडीच महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रशासनासमोर शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट आहे.

111 करबुडव्यांच्या मालमत्तांचा लिलाव
ठाणे : मालमत्ता करबुडवणाऱयांविरोधात ठाणे महापालिकेने कठोर मोहीम हाती घेतली आहे. वारंवार सांगूनही कर न भरणाऱया दिव्यातील 111 मालमत्तांवर टाच येणार आहे. या मालमत्तांचा 22 जानेवारी रोजी जाहीर लिलाव केला जाणार असून तब्बल 45 लाख रुपयांचा चुना पालिकेला लावला आहे. दिवा प्रभाग क्षेत्रांतर्गत एकूण 60 हजार मालमत्ताधारक असून 50 कोटींच्या करवसुलीचे टार्गेट निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी केवळ 22 कोटींची वसुली झाली. पालिका प्रशासनामार्फत मालमत्ता भरण्यासाठी अनेकदा नोटिसा बजावण्यात आल्या. तरीही कर न भरल्याने अखेर मालमत्तांचा थेट लिलावच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीनवेळा हा लिलाव पुकारण्यात येईल. ज्या मालमत्ता विकत घेण्यासाठी कुणी पुढे येणार नाही, अशा वास्तू पालिकेच्या नावावर करण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या