
पुण्यातील येरवडा जेलजवळील पोलीस वसाहतीसाठी राखीव असलेला तीन एकरचा भूखंड खासगी व्यावसायिकाला देण्याचे प्रकरण गाजत असतानाच मुंबईतील दहिसर (पूर्व) येथील भरुचा रोडवर असलेला पोलिसांचा एक राखीव भूखंड नुकताच गिळंकृत करण्यात आल्याचे उघड झाले आहे. ‘पोलिसांसाठी राखीव’ असा असलेला फलकच फेकून देऊन त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम व स्टॉल उभारण्यात आले आहेत.
भरुचा रोडवरील हा भूखंड दहिसर पेलीस ठाणे व उपायुक्त स्मिता पाटील यांच्या कार्यालयापासून अगदी हाकेवर आहे. भाटला देवी मंदिरसमोर असलेल्या या भूखंडावर चार महिन्यांपूर्वी पोलिसांचा फलक अगदी ठळकपणे दिसत होता. परंतु आता त्या भूखंडावर बांधकाम करून पोलिसांचा बोर्ड फेकून देण्याचे धाडस अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांनी केले आहे. भूखंड झाकून रस्त्याच्या लगत कपडय़ांचे स्टॉल लावण्यात आले आहेत.
महानगरपालिका व दहिसर पोलिसांनी बोर्ड फेकून त्यावर अनधिकृत बांधकाम करणाऱया भूमाफियांवर कारवाई का केली नाही याबद्दल तेथील नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. पोलिसांचे भूखंड पळविले जात आहेत. खुलेआम ते काबीज केले जात असतील तर मग सामान्य माणसांचे काय? असा सवाल तेथील नागरिक करीत आहेत. पूर्णप्रज्ञा शाळेच्या बाजूलाच पोलीस असा असलेला बोर्ड आम्ही गेली 40 वर्षे पाहत आहोत. परंतु भूमाफियांनी चार महिन्यांपूर्वी पोलिसांनाही बेघर केले आहे, असे तेथील वृद्ध नागरिक बोलत आहेत.



























































