
हिंदुस्थानच्या संघाला 2012 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारा उन्मुक्त चंद लग्नाच्या बेडीत अडकला आहे. उन्मुक्त चंद हा 21 नोव्हेंबर रोजी आपल्या फिटनेस कोचसोबत विवाहबद्ध झाला. उन्मुक्त चंद याची पत्नी सिमरन खोसला ही न्यूट्रीशन आणि फिटनेस ट्रेनर आहे. दोघांनी गुपचूप लग्न केले असून त्याचे जवळचे मित्र काही मोजके नातेवाईक या लग्नाला उपस्थित होते.
लग्नाचे फोटो उन्मुक्त चंद याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. लग्नात उन्मुक्त चंद याने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती, तर वधूने पारंपरिक कुमाऊनी पिचोरा परिधान केला होता. सिमरन खोसला उन्मुक्त चंदपेक्षा 5 महिने आणि 14 दिवसांनी लहान आहे. तिचा जन्म 9 सप्टेंबर 1993 रोजी झाला.
View this post on Instagram
उन्मुक्त चंद हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीचे प्रतिनिधित्व करत होता. आठ सीझन तो दिल्लीकडून खेळला. त्याच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानच्या अंडर-19 संघाने 2012 चा विश्वचषक जिंकला होता. तसेच 2013 मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 30 खेळाडूंच्या संघात त्याची निवड झाली होती. यासह 2014 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या 30 खेळाडूंमध्येही त्याचा समावेश होता. मात्र त्याला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.
View this post on Instagram
उन्मुक्त चंद याने काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. तो सध्या अमेरिकन क्रिकेट लीगमध्ये सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघासोबत खेळत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. त्याला या लीगच्या मेलबर्न रेनेगेड्स संघाने करारबद्ध केले आहे. विशेष म्हणजे बिग बॅश लीग खेळणारा तो पहिला हिंदुस्थानी क्रिकेटपटूही ठरणार आहे.
View this post on Instagram




























































