
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाल्याने उत्पन्नात प्रचंड घट झाली. उरलेले द्राक्ष विकण्यासाठी बाजारपेठाही उपलब्ध नसून व्यापारीही बागांकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱयांना पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कडेला बसून, मातीमोल भावात द्राक्ष विकण्याची वेळ आली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच नगर जिह्यासह राज्याच्या काही भागांत अवकाळी पाऊस बरसला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या गारपिटीमुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. कांदा, गहू, हरभरा आदी पिकांसह डाळिंब, द्राक्षाच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या. बाजारपेठेत विकण्यासाठी तयार असलेली द्राक्षे गळून पडल्याने शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. त्यातच उरलेली द्राक्ष विकण्यासाठी बाजारपेठेत दर मिळत नसल्याने शेतकरी कमी दरात व्यापाऱयांना द्राक्ष विकत आहेत. मात्र, व्यापारीही बागांकडे फिरकत नसल्याने पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव, पांढरीपूल, जेऊर शेंडी या रोडवर द्राक्षांचे शेकडो स्टॉल लागले आहेत. अस्मानी शक्तीसमोर हतबल झालेले शेतकरी केवळ 30 ते 40 रुपये किलो दरात द्राक्षे विकत आहेत.
महिन्याभरामध्ये तीन ते चार वेळा अवकाळी पाऊस गारपिटीने झोपून काढले आहे. हवामानात मोठा बदल झाल्याने बळीराजावर अस्मानी संकट कोसळले. सरकारने केवळ घोषणा केली. मात्र, अद्यापि नुकसानभरपाई मिळाली नाही. या सुलतानी संकटामुळे द्राक्ष बागायतदार अक्षरशः कोलमडून पडला आहे. उन्हाळ्याच्या हंगामात द्राक्षाला प्रचंड मागणी असते. मात्र, अवकाळी पावसामुळे द्राक्षाला मागणी नसल्याने उरलेले द्राक्ष बागांमध्येच पडून आहेत. त्यामुळे शेतकरी आपला माल मिळेल त्या भावात व्यापाऱयांना देत आहेत. व्यापारी साधारण 40 रुपये किलोच्या दरात ग्राहकांना द्राक्ष विकत आहेत.
नगर जिह्यात राहता, संगमनेर, कोपरगाव, श्रीगोंदा या पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात द्राक्ष उत्पादन घेतले जाते. इतर ठिकाणी द्राक्षाचे उत्पादन अत्यंत कमी आहे. मिळेल तिथे ग्राहकांना शोधण्यासाठी शेतकऱयांनी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर स्टॉल लावले आहेत.





























































