
उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तपासणी मोहीम सुरू आहे. या तपासणीदरम्यान कानपूरमध्ये तीन वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळली आहे. तसेच याबाबतची कोणतीही कागदपत्रे संबंधितांकडे नसल्याने पोलिसांनी रोकड जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
कानपूरमधील काकादेव परिसरात तपासणी सुरू असताना एका व्हॅनमध्ये पाच कोटींची रोकड आढळली आहे. तर स्वरुप नगर परिसरात 1 कोटींची रक्कम आढळली आहे. ही रक्कम कोणाची असून ही कुठे नेण्यात येत होती, याचा पोलीस शोध घेत आहेत. तसेच आयकर विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.
कानपूरमध्ये काकादेव परिसरात सीएमएस कंपनीच्या वाहनातून पोलिसांनी पाच कोटींची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम केस्को कंपनीच्या वीजबिलाच्या वसूलीची असून ही बँकेत नेत असल्याचे वाहनातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र, कर्मचाऱ्यांकडे या रक्कमेबाबतचे कोणतीही कागदपत्रे किंवा दस्तावेज नसल्याने पोलिसांनी रक्कम जप्त करत तपासाला सुरुवात केली आहे.
स्वरुप नगर परिसरातही तपासणीदरम्यान एका कंपनीच्या वाहनातून 1 कोटी 74 हजारांची रोकड आढळली आहे. या वाहनात चार कर्मचारी होते. ही रक्कम बँकेच्या एटीएमसाठी नेत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्याकडेही कोणतीही कागदपत्रे किंवा दस्तावेज आढळले नाहीत. त्यामुळे ही रक्कमही जप्त करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. ही रक्कम अवैध नसून त्याची कागदपत्रे पोलिसांना सादर करण्यात येतील, असे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कानपूर शहरात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या तपासणीत सात कोटींपेक्षा जास्त रोकड आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या रकमेबाबतची कोणतीही कागदपत्रे संबंधितांकडे नसल्याने आयकर विभागाला याची माहिती देण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.




























































