यूपीतील गुंडाला मुंबईत अटक, तीन रात्र पोलीस होते पाळत ठेवून

18

सामना प्रतिनिधी । मुंबई

हत्या, खंडणीचे गुन्हे असलेल्या आतिक रौफ शेखच्या साकीनाका पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याची माहिती देणाऱयांना उत्तर प्रदेश पोलिसांनी 50 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

आतिक हा तौकीर टोळीचा गुंड आहे. त्याच्या विरोधात 4 हत्येचे आणि 7 खंडणीचे गुन्हे दाखल आहे. मे महिन्यात तौकीर टोळीने प्रतापगडमधील सरपंचाची हत्या केली होती. हत्येनंतर आतिक मुंबईला पळून आला होता. प्रतापगड पोलिसांनी त्याची माहिती देणाऱयास बक्षीस जाहीर केले होते. आतिक हा मुंबईला लपून बसल्याची माहिती साकीनाका पोलिसांना मिळाली. वरिष्ठ निरीक्षक किशोर सावंत यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक कलीम शेख, सहायक पोलीस निरीक्षक रौफ शेख, उपनिरीक्षक विकास लोखंडे, झेंडे, केळुस्कर, घोंगळे, वाक्चौरे यांनी तपास सुरू केला. आतिक रात्रीच्या वेळेस वडिलांना भेटण्याकरिता येत असायचा अशी माहिती पोलिसांना मिळाली. तीन रात्र पोलीस तेथे सापळा रचून होते. तो त्या परिसरात नाव बदलून राहत होता. पोलिसांना गुंगारा देण्याकरिता त्याने केशरचना बदलली होती. आज पहाटे तो साकीनाका येथे आला असता त्याला सापळा रचून ताब्यात घेतले. आतिकला उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.

तो बनला एसी मेकॅनिक
उत्तर प्रदेशला गुन्हे केल्यावर आतिक मुंबईत आला. तो काही दिवस एसी मेकॅनिक म्हणून काम करत होता. पोलिसांना गुंगारा देण्याकरिता तो गुजरातला क्लीनरचे काम करत होता.

आपली प्रतिक्रिया द्या