
सामना ऑनलाईन । बरेली
हुंडाबंदीचा कायदा होऊन कित्येक वर्षं झाली तरीही अद्याप हुंडाबळी जात असल्याचं चित्र समोर आलं आहे. उत्तर प्रदेशात एका नराधमाने हुंडा दिला नाही म्हणून त्याच्या पत्नी व दोन वर्षाच्या बाळला जिवंत जाळले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, बरेली येथे राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा पती तिला हुंड्यावरून छळत होता. महिला मुकाट्याने त्याचा छळ सहन करत होती. पत्नीकडून हुंड्याचे पैसे मिळत नसल्याने संतापलेल्या पतीने तिला आणि तिच्यासोबत आपल्या २ वर्षांच्या मुलाला जिवंत जाळलं. यात दोघांचाही होरपळून मृत्यू झाला. या हत्येत त्याला ५ साथीदारांनी मदतही केली होती.
या घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. हुंड्याच्या हव्यासापोटी त्यांच्या मुलीवर दबाव आणला गेला आणि त्यातच तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






















































