राहुल गांधींना पोलिसांची धक्काबुक्की; कॉलर पकडली, जमिनीवर पाडले…

हाथरस येथील दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि भयंकर हत्याकांडामुळे देशभरात संताप व्यक्त होत असतानाच, आज पुन्हा उत्तर प्रदेश पोलिसांची दंडेलशाही अवघ्या देशाने पाहिली. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पायी निघालेले काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांना पोलिसांनी ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्प्रेस-वेवर रोखले. कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांनी धक्काबुक्की करीत राहुल गांधींची काॅलर पकडून त्यांना जमिनीवर पाडले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांना अटक करून नंतर सोडून देण्यात आले. दरम्यान उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारचे ‘जंगलराज’ सुरू आहे. लोकशाहीवर हा तर गँगरेप आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. दरम्यान प्रकरण मिटवण्यासाठी प्रशासन दबाव आणत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

उत्तर प्रदेशातील हाथरसजवळील गावातील 19 वर्षांच्या दलित तरुणीवर पंधरा दिवसांपूर्वी चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि जीभ कापली, पाठीचा मणका मोडला. सात दिवस उत्तर प्रदेश पोलिसांनी साधा एफआयआर नोंदविला नाही. मंगळवारी या पीडित तरुणीचा दिल्लीत उपचार सुरू असताना मृत्यू झाला आणि रातोरात पोलिसांनी जबरदस्तीने पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. या घटनेने अवघा देश सुन्न झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिरंजन चौधरी, काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते

रणदिप सुरजेवाला आदी नेत्यांसह कार्यकर्ते हाथरसकडे गुरुवारी सकाळी निघाले. मात्र, दिल्लीची सीमा ओलांडून उत्तरप्रदेशच्या हद्दीत प्रवेश करताच पोलिसांनी अडवले. 188 कलम लागू केले आहे. जमावबंदी असल्याने मोठय़ा संख्येने हाथरसला जाता येणार नाही असे पोलिसांनी सांगितले. उत्तरप्रदेश पोलिसांनी दंडेलशाही कायम ठेवली.

फक्त मोदी या देशात चालू शकतात का?

फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच या देशात चालू शकतात का? सर्व सामान्य व्यक्तीला परवानगी नाही का? असा सवाल राहुल गांधी यांनी यावेळी केला. दुःखदप्रसंगी आपल्या लोकांना एकटे सोडत नाहीत. पण, उत्तरप्रदेशात जंगलराज आहे. दुःखात असलेल्या एका परिवाराला सरकार भेटू देत नाही. एवढे घाबरू नका मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

पायी निघाले तरी रोखले; पोलिसांचा लाठीमार

  • पोलिसांनी अडविल्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा हे दोघे सुरुवातीला ग्रेटर नोएडाच्या यमुना एक्सप्रेस-वेवरून पायी निघाले. मात्र, पोलिसांनी त्यांना चालत जाण्यापासून रोखले. त्यामुळे संतप्त काँग्रेस कार्यकर्तेही चालत निघाले.
  • यमुना एक्सप्रेस-वेवर उत्तरप्रदेश पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. एक्सप्रेस-वेच्या जेवर टोल नाका येथे पोलिसांनी पुन्हा अडवले आणि लाठीमार केला. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाले.
  • पोलिसांनी राहुल गांधींना धक्काबुक्की केली. त्यांची काॅलर पकडून जमीनीवर पाडले. राहुल गांधींच्या खांद्याला दुखापत झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. उत्तरप्रदेश पोलिसांची ही दंडेलशाही अवघ्या देशाने वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह पाहिली.
  • आम्ही दोघेच हाथरसला चालत पुढे जातो. कोणत्या कलमानुसार तुम्ही अडवू शकता हे मीडियासमोर सांगा अशी विचारणा राहुल गांधी पोलिसांना करीत होते. मात्र, पोलिसांनी त्यांना पुढे जाऊ दिले नाही. त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा यांना अटक करून पोलीस जीपमध्ये घेऊन गेस्ट हाऊसला नेले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली असे वृत्त आहे.

माझी मुलगीही 18 वर्षांची आहे

हाथरससारख्या घटनांनी संताप होतो. माझी मुलगीही 18 वर्षांची आहे. प्रत्येक स्त्रीला संताप आला पाहिजे. अंत्यसंस्कार कुटुंबियांशिवाय करणं हे आपल्या हिंदू धर्मात पुठे लिहिले आहे, असं म्हणत प्रियंका गांधी-वढेरा यांनी भाजप सरकार आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. घमेंडी सरकारच्या लाठय़ा-काठय़ा आम्हाला रोखू शकणार नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या