
सामना प्रतिनिधी, न्हावाशेवा
कुळांना अंधारात ठेवून सावकाराने आकरे-कडापे येथील 300 एकर जमीन परस्पर रिलायन्स महामुंबई एसईझेडला विकल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे भूसंपादन अधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता या जमिनींचे व्यवहार पूर्ण करून दिले. यामध्ये 400 शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून या भयंकर प्रकाराविरोधात शेकडो शेतकऱ्यांनी उरण तहसील कार्यालयावर धडक देत आंदोलन केले.
उरण तालुक्यातील मौजे आकरे, कडापे येथील अब्दुल लतिफ महमद इस्माईल आणि इतर 7 साककारांच्या नावावर असलेली ही जमीन गेल्या कित्येक पिढ्या येथील शेतकरी कसत होते. या शेतजमिनीचे सावकाराचे डिक्रीचे हप्तेदेखील भरले आहेत. काही शेतकऱ्यांकडे त्याचे 32 एमचे दाखले आहेत. मात्र या शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत सावकारांनी प्रशासनाला हाताशी धरून या सातबारावरील कुळ म्हणून असलेल्या शेतकऱ्यांची नावे परस्पर कमी करून ही जमीन मुंबई विशेष आर्थिक क्षेत्रासाठी विकली. हे समजताच जानेवारी 2008 मध्ये या शेतकऱ्यांनी उरण तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले.
त्यानंतर तहसीलदारांनी कुळांची नावे पुन्हा 7/12 ला लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेतले. मात्र याचदरम्यान महामुंबई एसईझेडच्या विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी मे 2010 मध्ये कुळांची कोणतीही परवानगी न घेता व त्यांना कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता या जमिनीची ताबेपावती रिलायन्सच्या नावे करण्याचे आदेश दिले आहे. याविरोधात प्रत्येकवेळी केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेली जात असल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसत तहसील कार्यालयावर धडक दिली.
आत्मदहनाचा इशारा
300 एकर जमीन अनेक पिढय़ांपासून कुळांच्या ताब्यात आहे. आजदेखील हे शेतकरी ही जमीन कसत आहेत. मंडल अधिकारी कोप्रोली यांनी तसा पंचनामादेखील शासनाला सादर केला आहे. मात्र अनेक आंदोलने, निवेदने देऊनही शासन या जमिनीवर शेतकऱ्यांची नावे लावण्यास दिरंगाई करत असल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती गुरुनाथ गावंड यांनी दिली.


























































