
त्वचेवरील मळ, धूळ स्वच्छ करण्यासाठी आणि दिवसभराचा थकवा दूर होण्यासाठी अधूनमधून म्हणजे दिवसातून 2 ते 3 वेळा तरी चेहरा धुणे आवश्यक आहे. याकरिता अनेकांना फेसवॉश वापरण्याची सवय असते. काही वेळा रसायनयुक्त फेसवॉश, फेस क्लिंजर यामुळे त्वचेला अॅलर्जी होते. चेहऱ्यावर रॅश उठणे, पुरळ येणे यासारखे त्रास होऊ शकतात. याकरिता स्वयंपाकघरातीलच काही पदार्थांचा वापर केला तर चेहरा चमकदार आणि उजळ होतोच शिवाय त्वचेच्या समस्यांपासूनही सुटका होऊ शकते.
बेसन
चेहऱ्यावर पुरळ येण्याची समस्या असेल तर बेसन किंवा डाळीच्या पिठाचा वापर करा. यासाठी अंघोळीपूर्वी बेसनच्या पिठाचा लेप चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. हा लेप चेहरा आणि हातापायांनाही लावू शकता. यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाते आणि त्वचा मुलायम, चमकदार व्हायला मदत होते.
मुलतानी माती
तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती अतिशय गुणकारी मानली जाते. पूर्वीच्या काळी या मातीचा वापर चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी केला जायचा. मुलतानी माती चेहऱ्याला लावावी. वाळल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. चेहरा धुतल्यानंतर कोरडा झाल्यास कोरफडीचा गर लावावा. यामुळे चेहरा मॉइश्चराइज होऊन रंगही उजळू लागेल.
दुधाची साय
त्वचा कोरडी असेल तर दुधाच्या सायीचा वापर चेहऱ्याला लावण्याकरिता करू शकता. दुधाच्या सायीचा वापर फेस पॅक किंवा फेस स्क्रब तयार करण्यासाठीही करू शकता. यासाठी दुधाची साय 10 मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवा. त्यानंतर मसाज करून थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्याची त्वचा नॉर्मल असेल तर कोमट पाण्याचा वापरही करता येईल.
खडे मीठ
एका भांड्यात 2 ते 3 ग्लास कोमट पाणी घ्या. त्यामध्य 1 चमचा खडे मीठ घाला. या पाण्याने चेहरा धुवा. त्यानंतर कॉटन बॉलने (कापसाचा बोळा) चेहरा स्वच्छ पुसून काढा. हे पाणी टोनरचेही काम करते. यामुळे चेहऱ्याला चिकटलेली धूळ, माती, दुर्गंध निघून जायला मदत होते.
सफरचंदाचे व्हिनेगर (अॅपल सायडर व्हिनेगर)
त्वचेच्या सुरक्षेसाठी हल्ली अॅपल सायडर व्हिनेगर वापरले जाते. हे व्हिनेगर डायरेक्ट चेहऱ्याला वापरू नये. याचा वापर करण्याकरिता 2 कप पाण्यात 1 कप अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा. या मिश्रणाने चेहरा स्वच्छ धुवा. याचे प्रमाण अर्धेही घेऊ शकता. जर तुमची त्वचा सेंसिटिव्ह असेल तर याचा वापर करू नका.


























































