‘या’ प्राण्याच्या विषाची किंमत वाचून बसेल आश्चर्याचा धक्का; ह्रदयविकार, सौंदर्यप्रसाधने, वेदनाशामक औषधांसाठी वापर, वाचा सविस्तर

‘विंचू’…हे नाव जरी ऐकलं तरी त्याचा प्राणघातक दंश आठवल्यावाचून राहात नाही. विंचवाच्या नांगीत असलेलं विष प्राणघातक असतं, मात्र या विषाची किंमत आणि त्याचा होत असलेला वापर याबाबत वाचून नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. टर्की येथील एका प्रयोगशाळेत ‘या’ अतिशय जहाल असणाऱ्या विषावर प्रक्रिया करून नेमंक काय केलं जातं ते वाचा सविस्तर –

टर्की येथे एका प्रयोगशाळेत दिवसभरात विंचवाचं 2 ग्रॅम विष जमा केलं जातं. शेळीपालन, कुक्कुटपालन, त्याप्रमाणे या देशात असणारे मेदिन ओरॅनलेर ही जमात विंचू पालन करते.त्यांची निगा राखून त्यांना योग्य तो आहार दिला जातो. सध्या या जमातीकडे 20 हजार विंचू आहेत. प्रयोगशाळेतले कर्मचारी विंचू विषाचा छोटासा थेंब सोडेपर्यंत वाट पाहतात. विषाचा हा थेंब गोठवला जातो, त्याची पावडर केली जाते. या पावडरची विक्री युरोपमध्ये विकली जाते.

युनिव्हर्सिटी ऑफ लीड्समधील प्राध्यापक आणि विंचू दंशाचे अभ्यासक डेव्हिड बीच सांगतात की,मध्य आणि दक्षिण अमेरिकेत आढळणाऱ्या विंचवांपासून काढण्यात आलेल्या विषामध्ये मार्गाटॉक्सिन नावाचा एक घटक असतो. हा घटक रक्तवाहिन्यांमध्ये नवीन पेशी तयार करायला मदत करतो आणि तो हृदयाच्या बायपास सर्जरीमध्ये वापरला जातो.

हे विंचू 5 सेंटीमीटर ते 8 सेंटीमीटरपर्यंत वाढतात.त्यांचं विष हे जीवघेणं नसलं, तरी या विंचवाच्या दंशामुळे वेदना होते तसंच सूज येते आणि दंश झालेल्या जागेवर खाजही सुटते. मार्गाटॉक्सिन हा घटक हृदयविकारावर उपचार करताना शिरेवर स्प्रे करण्यासाठीदेखील वापरला जाऊ शकतो.ब्रिटीश हार्ट फांउडेशन, द वेलकम ट्रस्ट आणि ब्रिटीश मेडिकल रिसर्च कौन्सिल या संस्थांच्या सहकार्यातून विंचवाच्या विषाचा हृदयविकारावरील उपचारासंबंधीचा अभ्यास केला जात आहे. फक्त वैद्यकीय उपचारांमध्येच नाही तर सौंदर्य प्रसाधने,वेदनाशामक तसंच रोगप्रतिकारकक्षमतेशी संबंधित औषधांसाठीही विंचवाचं विष वापरलं जातं.

विषाची किंमत…
एका विंचवाच्या नांगीत केवळ 2 मिलीग्रॅम इतकंच विष असतं.300 ते 400 विंचवांपासून एक ग्रॅम विष मिळतं.या विंचवाच्या 1 लिटर विषाची किंमत 1 कोटी डॉलर्स म्हणजेत 80 कोटी रुपयांना हे विष विकलं जातं.