
उत्तर प्रदेशच्या बलिया येथे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट गंगेत उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू आहे. ही भीषण दुर्घटना सोमवारी सकाळी बलियाच्या माल्देपूर येथे घडली.
ही बोट माल्देपूर घाट येथून जात असताना अचानक पलटली. त्यावर 40 प्रवासी होते. अद्याप बेपत्ता झालेल्यांचा खात्रीशीर आकडा कळू शकलेला नाही. नदीकाठावर बचावकार्याला सुरुवात झाली आहे. प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार, या बोटीत क्षमतेहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे ही बोट पलटली. हे सगळे प्रवासी एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी चालले होते. बोट उलटल्यानंतर त्यातील काही जण पोहून बाहेर आले. काहींना स्थानिकांनी नदीत उड्या मारून वाचवलं.
स्थानिकांनी वाचवलेल्यांना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. बचाव पथकं बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. या दुर्घटनेचे काही व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. त्यात या दुर्घटनेनंतरचे क्षण चित्रित झाले आहेत.




























































