आधी फोटो कोण काढणार? ऐन लग्नात वर-वधुपक्षामध्ये जोरदार हाणामारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लग्न सोहळा म्हटलं की तिथे अनेक गोष्टींचा एकच कल्ला सुरू असतो. विधींसाठीची धावपळ, वऱ्हाडींची लगबग, फोटोग्राफर्स, भटजी इत्यादींच्या सूचना यांची गडबड उडालेली असती. पण, याच फोटोग्राफीमुळे एका लग्नात अक्षरशः धुमश्चक्री उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या देवरिया येथे ही घटना घडली.

उत्तर प्रदेशमधील एका लग्नामध्ये वरपक्ष की वधूपक्ष कोण आधी फोटो काढणार या मुद्द्यावरून वाद झाला. या वादामध्ये आधी बाचाबाची झाली आणि नंतर या बाचाबाचीचं रुपांतर थेट हाणामारीमध्ये झालं. हा सारा प्रकार 8 डिसेंबर रोजी घडला. लग्नासाठी रामपुर खरहाना धूसवरून वरपक्षातील लोक माधवपूर गावामध्ये आले होते. वरमाला घालून झाल्यानंतर लग्नामध्ये नातेवाईकांबरोबर फोटो काढण्यास सुरुवात झाली. यावेळी दारुच्या नशेत असलेल्या मुलीकडच्या वऱ्हाड्यांनी आम्हीच आधी फोटो काढणार असं म्हणत वधू-वरांच्या आजूबाजूला उभं राहण्यास सुरुवात केली. मात्र वरपक्षाकडील नातेवाईकांचीही हीच मागणी होती आणि ते सुद्धा नवदांपत्याच्या बाजूला उभे राहू लागले. यावरून दोन्ही बाजूच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचं रुपांतर पाहता पाहता धक्काबुक्कीमध्ये आणि नंतर मारहाणीत झालं. मुलीच्या काकांनी दोन्ही गटांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाच बेदम मारहाण करण्यात आलं. यामध्ये मुलीच्या बहिणीलाही मारहाण करण्यात आली.

रामपुर खरहाना पोलीस स्थानकामधील पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर लग्नमंडपामधील हाणामारीत जखमी झालेल्या वऱ्हाड्यांना रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आम्हाला लग्नामध्ये फोटो काढण्यावरुन वाद सुरू झाल्याची माहिती मिळाली.

पोलीस घटनास्थळी दाखल होण्याआधीच जखमींना रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं होतं, अशी माहिती वरिष्ठ पोलीस उपनिरिक्षक बलराम सिंह यांनी दिली. या वादामुळे नवरा एवढा वैतागला होता की त्याने लग्नाला नकार दिला. मात्र नंतर त्याची समजूत काढल्यानंतर त्याने लग्नास होकार दिला आणि दोघेही विवाहबंधनात अडकले.