उत्तराखंडचे मुख्यमंत्री रावत यांची उचलबांगडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंड भाजपमधील अंतर्गत कुरबुरीनंतर सोमवारच्या रात्री मोठय़ा राजकीय हालचाली घडून पक्षश्रेष्ठींनी अखेर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांची उचलबांगडी केली.

पक्षश्रेष्ठींच्याच आदेशावरून रावत यांनी मंगळवारी राजभवनात जाऊन राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्याकडे राजीनामा सोपवला. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालाची चार वर्षे पूर्ण होण्यास अवघे नऊ दिवस बाकी असतानाच त्यांना खुर्चीवरून हटवण्यात आले.

त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. मुख्यमंत्रीपदाचा चार वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याला फक्त नऊ दिवस बाकी आहेत. परंतु आता मुख्यमंत्री बनण्याची संधी दुसऱयांना द्यावी, असे आदेश पक्षाने दिले. त्यानुसार मी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला आहे, असे रावत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

पक्षाने तुम्हाला या पदावरून का हटवले, असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला. त्यावर या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तुम्हाला दिल्लीला जावे लागेल, अशा शब्दांत रावत यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयावरील नाराजी अप्रत्यक्षरीत्या व्यक्त केली. रावत यांच्या कार्यपद्धतीवर भाजप आमदारांनी पक्षाकडे तक्रारींचा पाढा वाचला होता.

आमदारांची नाराजी पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत महागात पडू शकते, या विचाराने भाजप पक्षश्रेष्ठींनी रावत यांना सोमवारी तत्काळ दिल्लीला बोलावले होते. त्यानुसार रावत यांनी दिल्ली गाठून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी नेत्यांची भेट घेतली होती. अखेर दिल्लीतून डेहराडूनला परतल्यानंतर रावत यांनी राजीनामा दिला.

नवा नेता कोण?

असंतुष्टांचे बंड थंड करण्यासाठी भाजपने त्रिवेंद्र सिंह यांची उचलबांगडी केली. मात्र आता मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची निवड करतानाही भाजपची चांगलीच कसोटी लागणार आहे. पक्षाच्या आमदारांची बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास बैठक होणार आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून सध्याचे शिक्षणमंत्री धन सिंह रावत यांचे नाव चर्चेत आहे. याचवेळी अनिल बलूनी, अजय भट्ट हे खासदारही या शर्यतीत उतरले आहेत.