लोकशाहीसाठी… संविधानासाठी! महाविकास आघाडीची आज ‘वज्रमूठ’ सभा; गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
  • स्थळ‘एमएमआरडीए’ मैदान, बीकेसी
  • वेळ सायंकाळी 5 वाजता
  • उद्धव ठाकरे यांच्यासह  अजित पवार, नाना पटोले यांचे प्रमुख मार्गदर्शन

देशाच्या संविधानाचे रक्षण… हुकूमशाहीचा तीव्र विरोध आणि राज्यातील घटनाबाह्य खोके सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी  महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा सोमवार, 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी मुंबईत होत आहे. राज्यभरात महाविकास आघाडीला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. यापूर्वी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे झालेल्या वज्रमूठ सभांना लाखोंची गर्दी झाली होती. मुंबईतील वांद्रे–कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणारी सभा ही अतिभव्य आणि रेकॉर्डब्रेक ठरणार असून सभेच्या तयारीसाठी आघाडीतील प्रत्येक कार्यकर्ता झटून काम करत आहे.

बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. नियोजनबद्ध आसनव्यवस्था करण्यात आली आहे. सभास्थळी हजारो लोक वाहनांनी येणार असल्याने पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे. महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सभेच्या तयारीसाठी मेहनत घेत आहेत. विराट संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन महाविकास आघाडीने मुंबईकरांना केले आहे.

केंद्रातील मोदी सरकारकडून महाराष्ट्रावर सातत्याने अन्याय होत आहे. महाराष्ट्र राजकीय, सामाजिकदृष्टय़ा अस्थिर ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. या जुलूमशाहीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीने वज्रमूठ बांधली आहे. संविधानाच्या रक्षणासाठी आणि हुकूमशाहीच्या विरोधात उद्या महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुंबईत होणारी तिसरी ‘वज्रमूठ’ सभा अतिविराट होणार आहे.