पुढच्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे दिसणार नाहीत; प्रकाश आंबेडकर यांचा खळबळजनक दावा

लोकसभा निवडणुकीनंतर दोन महिन्यांनी एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

हिंगोली, परभणी, नांदेड येथे आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. या सभांमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीमध्ये जागावाटपावरून महायुतीमध्ये अजूनही तिढा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊनही भाजपला हवा तेवढा फायदा होताना दिसत नसल्याचे अनेक सर्व्हे सांगत आहेत. त्यामुळे दोन महिन्यांनंतर ते भाजपसोबत दिसणार नाहीत, असे आंबेडकर म्हणाले.

z मोदी हे पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मोदींविरोधात मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले. मोदी तर भाजपलाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते भाजपा सरकार न म्हणता नेहमी मोदी सरकार असा उल्लेख करतात, असे आंबेडकर म्हणाले.

 कोणत्या तोंडाने संघवाले मोदींसाठी मते मागतात

देशाची आर्थिक स्थिती चांगली असती तर लोक देश सोडून गेले असते का, असा सवाल करत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला. सुमारे 50 कोटींची मालमत्ता असलेली 17 लाख कुटुंबे देश सोडून गेली. ती मुस्लिम किंवा ख्रिश्चन नाहीत तर हिंदू आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्या तोंडाने मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मते मागतोय? त्यांना लाजही वाटत नाही का, असा सवालही आंबेडकर यांनी केला.