राज्यभरातील दैवतांचे सेवेकरी पारंपरिक वेशात मातोश्रीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील विविध देवस्थानातल्या आराध्य दैवतांचे सेवेकरी पारंपरिक वेशात उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले होते. यावेळी या सेवेकऱ्यांकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दर्शवण्यात आला.

भेटीसाठी आलेल्या सेवेकऱ्यांची भेट घेत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचं वातावरण पाहिलं तर तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, याची मला खात्री वाटते. कारण, गेली 56-57 वर्षं दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होत आहे. शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. यावर्षी सुद्धा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

या सेवेकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. मला बऱ्याच वर्षांनंतर मला वासुदेव दिसला, गोंधळी दिसले, नंदीबैल दिसला. शहरातून या परंपरा हद्दपार झालेल्या दिसताहेत. आज नंदीबैलाकडे पाहून मला लहानपण आठवलं. तुम्ही देवाची भक्ती करणारी माणसं आहात. वासुदेव आल्यानंतर दिवसाची सुरुवात सुंदर व्हायची. मुंबईतही पूर्वी वासुदेव यायचे, तेव्हा वाटायचं सकाळ झाली. पण, आता तुमची परंपरा राहिली काय किंवा नाही राहिली काय, याचं कुणाला काहीही पडलेलं नाही. पण, खुर्ची कशी टिकेल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अनेक मंत्री नाराज आहेत, पण तुमच्यावर होणारा अन्याय पाहून एकतरी मंत्री नाराज झालाय का? अशी टीकाही त्यांनी यावेळी मिंधे सरकारवर केली.