
अल्बर्ट हॉलमध्ये गाणारी पहिली हिंदुस्थानी गायिका
1974 साली लंडनच्या अल्बर्ट हॉलमध्ये लतादीदींचा पहिला कार्यक्रम झाला. हिंदुस्थानींना इंग्लंडच्या भूमीवर म्हणजे अल्बर्ट हॉलमध्ये कार्यक्रम करायची परवानगी नव्हती. मात्र लतादीदींनी तिथेच जाऊन गाण्याचा हट्ट धरला. कार्यक्रमाच्या दिवशी तर हॉलमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. दीदींच्या स्वरांनी इंग्लंडवर राज्य केले होते.
संगीतातील सात सूर म्हणजे लता
एकदा आचार्य अत्रेंना लताबद्दल लिहायला सांगितलं तेव्हा शब्दप्रभू अत्रे म्हणालेः
‘केवळ लोखंडाच्या निपातून उतरल्या शाईनं, जाडय़ा भरडय़ा कागदावर लताला अभिवादन करणं म्हणजे एखादया अप्सरेच्या मृदुल चरणकमलाखाली गोणपाटाच्या पायघडय़ा अंथरण्यासारखं आहे.’
लताच्या प्रतिभेला साजेसं अभिवादन करायचं असेल तर..
‘पहाटकाळची कोवळी सुवर्ण किरणं दवबिंदूमध्ये भिजवून कमलतंतूच्या लेखणीने फुलपाखराच्या पंखावर लिहिलेलं मानपत्र तिला गुलाब कळीच्या करंडकातून अर्पण करायला हवं.’
‘लताचा आवाज हा मानवी सुष्टीतला एक अद्भूत चमत्कार आहे. साक्षात विधात्याला सुद्धा असा चमत्कार पुन्हा घडवता येणार नाही.’
‘श्रीकृष्णाच्या मुरलीचा साद, उर्वशीच्या नूपुरांची रुणझुण आणि सरस्वतीच्या वीणेचा झंकार हे तिन्ही एकवटून विधात्याने आपल्या लताचा कंठ घडवला असेल.’
‘सूर, लय, ताल, सिद्धी आणि प्रसिद्धी या गोष्टी जिथे एकत्र येतात त्या जागेला आपण लता मंगेशकर असं म्हणावं. कारण संगीतातील सात सूर म्हणजे फक्त आणि फक्त आपली लता मंगेशकर.
वाघा बॉर्डरवर नूरजहाँ-लता भेट
गायिका नूरजहाँ आणि लता मंगेशकर यांच्यामध्ये खास स्वरबंध होते. लतादीदींना नूरजहां खूप आवडायच्या. तर नूरजहाँ दीदीला म्हणायच्या, मी गायिका नटी आहे आणि तुझ्याकडे नटलेले सूर आहेत.
1947 साली देशाची फाळणी झाल्यानंतर नूरजहाँ पाकिस्तानला निघून गेल्या होत्या. 1951 साली फाळणीच्या जखमा ताज्या असताना दोघींची भेट झाली होती, तीही वाघा बॉर्डरवर. सीमेवर दोन देशांच्या मध्ये जी मोकळी जागा असते, त्याला म्हणतात नो मॅन्स लॅण्ड. सूरांच्या दोन सम्राज्ञींची भेट त्या ठिकाणी झाली. नूरजहां- लता यांच्या डोळ्यांत पाणी होतं. हसू आणि आसू यांचे त्या सीमारेषेवर मिश्रण झाले होते. खूप वेळ दोघींना बोलताच येईना. नूरजहां यांनी दीदींसाठी थाळ्या भरून नानाविध पदार्थ खायला आणले होते. दीदींना आंबे आवडतात, म्हणून खूप आंबेही आणले होते.
त्यानंतर 1982 साली नूरजहां हिंदुस्थानात आल्या होत्या. तेव्हाही दोन्ही मैत्रिणींची भेट झाली होती. असंही त्या दोघी खूप वेळ फोनवर बोलायच्या. दोघांच्या उशिरापर्यंत गप्पा रंगायच्या.
‘सीआयडी’ मालिकेवर विशेष प्रेम
सलग 21 वर्षे चाललेली ‘सीआयडी’ ही मालिका दीदींची सर्वात आवडती. या मालिकेतला जवळपास प्रत्येक एपिसोड त्यांनी पाहिला. जेव्हा ही मालिका बंद पडली तेव्हा दीदी अस्वस्थ झाल्या. ही मालिका पुन्हा सुरू व्हावी, अशी विनंती त्यांनी ट्विटवरून केली होती.
या मालिकेतील सर्व कलाकारांशी त्यांची चांगलीच मैत्री जमली होती. अनेकदा सीआयडीच्या संपूर्ण टीमला दीदींनी जेवणाचे आमंत्रण देले होते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो देखील त्यांचा आवडता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांना भेटवस्तू पाठवत त्यांचे कौतुक केले होते.
गुलाम हैदरनी केली अस्सल हिऱ्याची पारख
1940 च्या दशकात ज्यावेळी दीदींनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला त्यावेळी नूरजहां, शमशाद बेगम आणि जोहरा बाई अंबाले यांच्यासारख्या दमदार गायिकांचा दबदबा होता. त्यावेळी शशधर मुखर्जी यांनी लतादीदींना संधी नाकारली.
प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गुलाम हैदर यांनी लता मंगेशकर यांची ओळख प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याशी करून दिली होती. शशधर यांनी लता दीदींचा आवाज ऐकला आणि सांगितले की ‘तिचा आवाज खूप पातळ आहे आणि ते तिला आपल्या चित्रपटात गाणे गायला देऊ शकत नाहीत.’ हे ऐकून गुलाम हैदर संतापले आणि म्हणाले की, ‘तुम्ही मोठी चूक करत आहात. मी तुम्हाला सच्चाई सांगून जातोय. हाच आवाज एक दिवस जगावर राज्य करेल.’ पुढे झालंही तसंच.
1948 मध्ये गुलाम हैदर यांच्यासोबत ‘मजबूर’ या सिनेमात लतादीदींना मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर 1949 मध्ये ‘बरसात’, ‘दुलारी’, ‘महल’ आणि ‘अंदाज’ सिनेमा प्रदर्शित होऊन हिट ठरले. त्यांच्या गाण्यांना लोकप्रियता मिळाली. त्यानंतर दीदींनी मागे वळून पाहिलं नाही.
लता-किशोर डय़ुएट गाजले
लता मंगेशकर आणि किशोर कुमार या जोडीने अनेक सदाबहार गाणी दिली. तेरे बिना जिंदगी से, नीले नीले अम्बर पर, तुम आ गये हो नूर आ गया है, हम दोनो दो प्रेमी, परदेसिया, अशी किती आणि कोणती गाणी सांगायची. यादी न संपणारी.
दत्ता डावजेकरांनी दिली पार्श्वगायनाची संधी
डीडी अर्थात संगीतकार दत्ता डावजेकर यांनी हिंदी- मराठी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका म्हणून लतादीदींना पदार्पणाची संधी दिली. हिंदी चित्रपट होता ‘आपकी सेवा में’ आणि गाणे होते ’पा लागूं कर जोरी रे’. तसेच मराठी चित्रपट होता ‘माझे बाळ’. आपण एका इतिहासाची मुर्हूतमेड घडवतोय याची डावजेकरांना त्यावेळी कल्पनाही नसावी. याच दरम्यान संगीतकार के. दत्ता अर्थात दत्ता कोरगावकरांच्या चित्रपटासाठी देखील दीदींनी गाणी गायली. ही गाणी देखील त्यावेळी सर्वांच्या पसंतीस उतरली होती.


























































