
सोनी मराठीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेने नुकताच 375 भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या मालिकेत संत ज्ञानेश्वरांची भूमिका करणारा कलावंत वरुण भागवत… एक प्रॉमिसिंग चेहरा…
पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल, रमणबागमधून वरुण भागवतचे शालेय शिक्षण झाले. ‘सोनियाचा उंबरा’ नामक मालिकेत शाळेत असतानाच त्याने ‘किट्टूt’ ही व्यक्तिरेखा साकारली होती. अकरावीमध्ये कॉलेजमध्ये असताना ‘अल्ला के बंदे’ या हिंदी चित्रपटात त्याची ‘याकूब’ ही महत्त्वपूर्ण भूमिका होती आणि या भूमिकेकरिता त्याला ‘स्टार स्क्रीन अवॉर्ड’साठी नामांकन मिळाले होते. अभिनयाची आवड असली तरी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, या उद्देशाने त्याने या क्षेत्रापासून काही काळ दूर राहून ‘एम.आय.टी. ह्युमन रिसोर्स’ विषयात एम.बी.ए. पूर्ण केले. पुणे विद्यापीठातून वरुणने पहिला येण्याचा मान मिळवला. मग काही वर्षे नोकरीदेखील केली. ‘बॉक्स पॅक जोडीदार’ नामक एक नाटकात त्याने राज्य नाटय़ स्पर्धेत अभिनयाचे प्रशस्तीपत्र मिळवले होते. मग ‘अनबिटन’ नामक एकांकिका स्वतः लिहिली आणि दिग्दर्शित केली होती. दरम्यान ‘ज्ञानेश्वर माऊली’ मालिकेच्या ऑडिशनसाठी तो गेला होता. ऑडिशन झाली, पण ती सुरुवातीला निवृत्तीनाथांच्या भूमिकेसाठी झाली. मग पुन्हा ज्ञानेश्वरांच्या भूमिकेसाठी ऑडिशन झाली, मग लूक टेस्ट अशा पायऱ्या पार करत असे ठरले की, संत ज्ञानेश्वरांच्या लहानपणीची आणि मोठेपणीची दोन्ही भूमिका वरुणलाच करायच्या आहेत. वरुण म्हणतो, ‘‘संत ज्ञानेश्वरांची भूमिका करणे हे खूप आव्हान होते. मी ‘मोगरा फुलला’ ही गो. नि. दांडेकर यांची साहित्यकृती वाचली. त्यातून मला त्या काळातील भाषेची शैली कळली. मग सेटवर दिगपाल लांजेकर यांच्याशी चर्चा केली. त्यातून भूमिकेचा प्रवास उलगडत गेला. मग आवाजाच्या क्षेत्रातील गुरू शामराव जोशी यांचेही मार्गदर्शन मला लाभले. त्यांच्याकडून आवाजाचे प्रशिक्षण घेतले.
संत ज्ञानेश्वर यांची व्यक्तिरेखा साकारण्याकरिता वरुणने दहा किलो वजन कमी केले. मांसाहार पूर्ण वर्ज्य केला. मालिकेला पूर्णवेळ देण्याकरिता त्याला नोकरी सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. चॅनलने आणि निर्माता, दिग्दर्शकांनी वरुणला ज्या विश्वासाने ही भूमिका दिली. तो विश्वास सार्थ ठरवण्यात वरुण नक्कीच यशस्वी झाला. आज वरुणच्या या प्रवासात त्याच्या आई-वडिलांच्या, आजीच्या संस्कारांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. तसेच त्याच्या पत्नीचा पुनमचा पूर्ण पाठींबा त्याला असतो हे तो आवर्जून सांगतो. त्याने आणि पूनमने पुण्यात इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसायदेखील सुरू केला आहे.
>> गणेश आचवल


























































