
>>डॉ. प्राची मोघे
प्राचीन हिंदुस्थानात राज्यपद्धती विकसित झालेली होती. राष्ट्र, राज्य, प्रशासन, राज्यव्यवस्था या संकल्पना स्पष्ट होत्या. याची झलक आपल्याला वैदिक वाङ्मयातच मिळते. समाज योग्य पद्धतीने चालावा, त्याला धर्माचे अधिष्ठान असावे याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. याचेच दर्शन तत्कालीन राज्यपद्धतीत दिसून येते.
वैदिक काल हा प्राचीन हिंदुस्थानी संस्कृतीचा एक महत्त्वपूर्ण कालखंड आहे. याच काळात वैदिक वाङ्मय तयार झाले. वैदिक ऋषींनी ते रचले नाही, तर त्यांना ते दृग्गोचर झाले म्हणून वैद्यक ऋषींना द्रष्टे म्हणतात आणि वैदिक वाङ्मय अपौरुषेय आहे असे मानतात. या काळात संस्कृती जाणून घेण्यासाठी वैदिक वाङ्मय जे आर्ष संस्कृतमध्ये आहे, तेच एक महत्त्वाचे साधन आहे. संहिता (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद अशा चार वेदांची संहिता), प्रत्येक वेदाचे ब्राह्मण, आरण्यक, उपनिषद आणि सहा वेदांगे- व्याकरण, छंद, निरुक्त, ज्योतिष, शिक्षा आणि कल्पसूत्र असा वैदिक वाङ्मय याचा संभार आहे. प्रत्येक वेदाच्या अनेक शाखा होत्या, पण आता काहीच शाखा शिल्लक आहेत. वैदिक काळाचे विभाजन दोन भागांत ऋग्वैदिक काल- 1500-1000 इ. पू. आणि उत्तर वैदिक काल- 1000-600 इ. पू. असा केला गेला होता, पण आजकाल असे विभाजन मानत नाहीत. वैदिक संस्कृतीची कालनिश्चितीसंदर्भात अनेक मतमतांतरे आहेत, पण अर्थात कालनिश्चिती हा या लेखाचा विषय नाही. वैदिक वाङ्मय आणि तत्कालीन राज्यपद्धती हा या लेखाचा विषय आहे.
प्राचीन हिंदुस्थानात राज्यपद्धती विकसित झालेली होती. राष्ट्र, राज्य, प्रशासन, राज्यव्यवस्था या संकल्पना स्पष्ट होत्या. याची झलक आपल्याला वैदिक वाङ्मयातच मिळते. वैदिक काळातच राज्यसंस्था विकसित झाली होती. त्याचे उक्रांत स्वरूप दृग्गोचर होत होते. सर्वप्रथम कुल, कुटुंब, ग्राम, विश, जानपद आणि राष्ट्र असा त्याचा विकास होत होता. त्या छोटय़ा घटकांचे प्रमुख हे निवडलेले किंवा नेमणूक केलेले असत. जसे कुल-कुटुंब, ग्राम-ग्रामणी, विश-विशपती, जानपद-ज्येष्ठ, राष्ट्र-राजन/गोप/सम्राट इ. राजा अथवा राष्ट्रप्रमुख याला राजा, महाराजाधिराज, सम्राट असे संबोधित असत. राजा हा सर्वंकष असला तरी राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असे. राजपुरोहिताचा धर्मदंड राजधर्माचे पालन नीट होत आहे ना, यावर नियंत्रण ठेवत असे. याचबरोबर सभा समिती यातील सभासद यांचाही राजा, त्याचे मंत्रिमंडळ यावर अंकुश असे. त्यामुळेच वैदिक राजाकडे अनियंत्रित सत्ता नसे. राजा हा समितीला विचारल्याशिवाय काहीच करू शकत नसे (ऋ.10-166.4) अथर्ववेदात 3-4. 2 मध्ये निवडणूक प्रक्रियेचे वर्णन येते. ऐतरेय ब्राह्मणात प्रशासनिक राजनीतीचे पाच प्रकार येतात.
राज्यप्रमुख – निवड
1) साम्राज्य – सम्राट – वंशपरंपरागत
2) भोज्य – भोज- निश्चित कालावधीसाठी नेमणूक
3) स्वराज्य – सम्राट- कुलाज
4) वैराज्यं -राजा – लोकप्रतिनिधी
5) राज्य – कुल – लोकशाही
राजा युद्धाचे नेतृत्व करत असे. त्याला करवसुलीचा अधिकार नव्हता. जनता आपल्या इच्छेनुसार जे देईल, राजा त्यातच आपला खर्च भागवत असे. नंतर जेव्हा राज्यसंस्था विकसित झाली तेव्हा करप्रणाली अस्तित्वात आली. जनतेने त्यांच्या उत्पन्नाचा सहावा भाग कर म्हणून राजाला द्यायचा आणि त्या बदल्यात राजाने त्यांचे संरक्षण करायचे. राजाचे प्रशासनिक सहयोगी पुरोहित आणि सेनानी असे 12 रत्निन होते. चारागाह म्हणजे गुप्तहेर याचे प्रधानाला वाज्रपती आणि लढाऊ दलांचा प्रधान याला ग्रामिणी म्हटले जात होते असा उल्लेख आढळतो. 12 रत्निन या प्रकारे होतेः पुरोहित- राजाचा प्रमुख सल्लागार, राजदंडावर धर्मदंडाचा प्रभाव होता. सेनानी- सेनेचा प्रमुख, ग्रामिणी – गावाचा सैनिक पदाधिकारी, महिषी- राजाची थोरली पत्नी, सूत- राजाचा सारथी, क्षत्री- प्रतिहार म्हणजे द्वारपाल, संग्रहित- कोषाध्यक्ष, भागदुक – कर गोळा करणारा अधिकारी, अक्षवाप- लेखाधिकारी, गोविकृत- वनाधिकारी, पालागल- राजाचा मित्र.
पुरूप, दुर्गपती आणि स्पर्श हे जनतेच्या हालचालींवर नजर ठेवणारे गुप्तचर होते. वाजपति-गोचर भूमीचा अधिकारी होता. गुन्हेगारांना शासन देणारी वेगळी व्यवस्था होती. सभा आणि समिती राजाला सल्ला देणाऱया संस्था होत्या. सभा श्रेष्ठ आणि धनिक, उच्चभ्रू लोकांची संस्था होती, तर समिती सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करत असे. अथर्ववेदात सभा आणि समिती या प्रजापतीच्या दोन कन्या आहेत असे म्हटले आहे. समितीचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे राजाची निवड करणे हे होय. समितीच्या मुख्य अधिकाऱयाला ईशान किंवा पती म्हणत असत.
विदथ सर्वात प्राचीन संस्था होती. ऋग्वेदात विदथ याचा सगळ्यात जास्त म्हणजे 122 वेळा उल्लेख आला आहे. विदथ ही एक स्त्र्ााr-पुरुषांची सामाजिक संस्था होती. नववधूंचे स्वागत, धार्मिक अनुष्ठान असे सामाजिक कार्य विदथ यात होत असे. वेदामध्ये राष्ट्रसूक्त आहे. शुक्लयजुर्वेदातील राष्ट्रसूक्ताचा अर्थ पुढीलप्रमाणे
हे ब्रह्मन् ! स्वराष्ट्रात में हों, द्विज ब्रह्म तेजःपुंज असू देत. क्षत्रिय महारथी, अरिदल विनाशकारी असू देत. गाई दूधदुभते जनावरे, तेज दौडणारे अश्व असू देत. सदा सुभग नारी राष्ट्राचा आधार होवो. बलवान, सभ्य, योद्धा, पुत्र होवो. आमचे स्वातंत्र्य अबाधित राहो. आमचा योग-क्षेम सुरळीत, निरंतर चालू दे.
अशा प्रकारे वैदिक वाङ्मय यातून राजनीतीचा, राष्ट्राचा नितांतसुंदर परिचय होतो. तत्कालीन द्रष्टे ऋषी सर्व समाजाच्या कल्याणाची चिंता वाहत असत. समाज योग्य पद्धतीने चालावा, त्याला धर्माचे अधिष्ठान असावे याची पुरेपूर काळजी घेतली गेली होती. याचेच दर्शन तत्कालीन राज्यपद्धतीत दिसून येते.
(लेखिका पुरातत्वशास्त्र्च्या प्राध्यापक आहेत)
– [email protected]


























































