ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

गेली अनेक वर्षं आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपलं अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी 2023 वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले आहे.