
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठी साहित्य समीक्षेच्या प्रांतातील अत्यंत आदरणीय नाव, ज्येष्ठ समीक्षक, ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार विजेते साहित्यिक म. सु. पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा मुलुंड येथील घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कवयित्री नीरजा यांचे ते वडील होत. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी मुलुंड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व हरपले अशी भावना व्यक्त होत आहे.
म. सु. पाटील यांचा जन्म 1931 मध्ये रायगडमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. नाशिक जिह्यातील मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. 1946 ते 1964 या काळात त्यांनी गिरणी कामगार, कारकून आणि शिक्षक म्हणूनही काम केले. 1969 नंतर ते मनमाडच्या महाविद्यालयात प्राचार्य झाले.
प्रा. म. सु. पाटील यांना ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या पुस्तकासाठी जानेवारी 2019 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
साहित्य संपदा
- तुकाराम – अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे
- दलित कविता व दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
- प्रभाकर पाध्ये : वाङ्मय दर्शन (संपादित, सहलेखक – गंगाधर पाटील)
- बदलते कविसंवेदन
- लांबा उगवे आगरी (आत्मकथन, अनुभव कथन, माहितीपर)
- सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध




























































