उद्योगमंत्री उदय सामंतांविरुद्ध हक्कभंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जत-जामखेड मतदारसंघातील एमआयडीसीबाबत विधिमंडळ अधिवेशनात सकारात्मक उत्तर देऊनही कार्यवाही न केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरुद्ध आज हक्कभंग प्रस्ताव दिला. विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी ही माहिती दिली. उदय सामंत, उद्योग विभागाचे अधिकारी कांबळे आणि एमआयडीसीचे एमडी या तिघांविरुद्ध हा हक्कभंग प्रस्ताव आपण विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्याकडे दिल्याचे पवार यांनी सांगितले. एमआयडीसीचा मुद्दा अधिवेशनात आपण अनेकदा मांडला. त्यावर सामंतांनी प्रत्येक वेळी उत्तर सकारात्मक दिले. असे सकारात्मक उत्तर दिल्यानंतर कार्यवाही करावी लागते, परंतु उद्योगमंत्री सामंत यांनी अद्यापपर्यंत ती केली नाही. कदाचित त्यांना करायची असेल, पण भाजपचा दबाव असल्याने ते करत नसतील, असा आरोपही रोहित पवार यांनी केला. आपले विरोधक असलेले भाजप आमदार राम शिंदे यांना एमआयडीसी होऊ नये असे वाटत असल्यामुळे भाजपकडून कार्यवाही होत नसावी असे ते म्हणाले.