विधान परिषद निवडणुकीचा धुरळा; सेटिंग, मीटिंग सुरू! कोण धोक्यात, कोण जोशात!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या सहा जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असून उमेदवार निवडून आणण्यासाठीच्या सेटिंग, मीटिंग सुरू झाल्या आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने दादरा नगर हवेलीत दणदणीत विजय संपादन करीत सीमोल्लंघन केले. त्याबरोबरच महाविकास आघाडीला देगलूर बिलोली मतदारसंघात घवघवीत यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आगामी विधान परिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम राहील या भीतीने भाजपच्या पोटात भीतीचा गोळा आला आहे.

  विधान परिषदेच्या 1 जानेवारी रोजी मुदत संपणाऱया आठ जागांपैकी सहा जागांसाठी 10 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे या निवडणुकीत परिषदेतील विद्यमान आमदारांना संधी मिळणार की त्यांच्या जागी अन्य कुणाला उमेदवारी मिळेल. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. मुंबईच्या दोन जागांपैकी एक जागा शिवसेनेकडे तर दुसरी जागा काँग्रेसकडे आहे. महापालिकेतील शिवसेना नगरसेवकांची संख्या पाहता या निवडणुकीत शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे. अकोल्यातील जागेवरही शिवसेनेचा विजय सुकर आहे.

सतेज पाटलांसमोर भाजपचा उमेदवार कोण?

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपदही आहे. त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्चित असून महाविकास आघाडी एकत्र लढल्यास विजयाचा मार्गही सुकर मानला जात आहे. मात्र मागील निवडणुकीत पराभूत झालेले महादेव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असून तसे झाल्यास अमल महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा सामना रंगणार आहे.

मिशन मुंबई

काँग्रेसने महापालिका निवडणुकीसाठी ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. मात्र विधान परिषद निवडणूक आघाडी एकत्र लढली तरच काँग्रेस उमेदवारासाठी ही निवडणूक सोपी ठरेल. तसे न झाल्यास काँग्रेसकडे महापालिकेचे केवळ 29चे संख्याबळ असल्याने त्यांचा मार्ग खडतर आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांना पहिल्या पसंतीच्या 77 मतांचे बहुमत गाठण्यासाठी आणखी 48 नगरसेवकांच्या मतांची जुळवाजुळव करावी लागेल.

दिवंगत रणपिसे यांच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक

विधान परिषदेचे सदस्य दिवंगत शरद रणपिसे यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेकरिता 29 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत मतदान होईल.

नागपुरात गिरीश व्यासांच्या जागी भाजपकडून इच्छुकांची मोर्चेबांधणी

नागपुरात गिरीश व्यासांआधी काँग्रेसचे राजेंद्र मुळक यांनी या निवडणुकीत बाजी मारली होती. त्यामुळे आताही ते पुन्हा कामाला लागले आहेत. मुळकांव्यतिरिक्त काँग्रेसकडून अन्य कोणीही उमेदवारीसाठी उत्सुक नाही. भाजपकडून गिरीश व्यासांना ही उमेदवारी मिळणार याची खात्री असली तरी भाजपचे उपाध्यक्ष संजय भेंडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विक्की कुकरेजा यांनीही या उमेदवारीसाठी दावा सांगितला आहे. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीमुळे झालेल्या पराभवामुळे विधान परिषदेच्या या महाभारतात भाजपचा विजय होईल का, याचे गणित भाजपचे व्यास मांडत आहेत.

अमरीश पटेलांचे काय होणार?

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱया अमरीश पटेल यांच्या विधान परिषदेच्या जागेसाठी डिसेंबर 2020मध्ये पोटनिवडणूक झाली तेव्हा पटेल हे भाजपचे विजयी उमेदवार ठरले.  त्यांना आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असून यावेळी महाविकास आघाडीचा योग्य समन्वय झाल्यास पटेलांसाठी ही निवडणूक कांटे की टक्कर ठरेल.