विजय दिवस समारोहास दिमाखात प्रारंभ; कराडला शोभा यात्रा, शस्त्रास्त्र प्रदर्शन

740

दिमाखदार शोभायात्रेने विजय दिवस समारोहास शनिवारी कराड येथे दिमाखात प्रारंभ झाला. त्यानिमीत्ताने लिबर्टीच्या मैदानावर आयोजीत करण्यात आलेल्या शस्त्रास्त्र प्रदर्शनाचेही उद्‌घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र सज्जतेची चुणूकच प्रदर्शनातुन पहायला मिळत असल्याने ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी पहिल्या दिवसापासूनच प्रदर्शनस्थळी गर्दी केली आहे.

नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार, स्वातंत्र्य सैनिक भाई गंगाराम गुजर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर, विजय दिवस समितीचे सचिव ऍड. संभाजीराव मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे, चंद्रकांत जाधव, प्रा. बी. एस. खोत, विनायक विभुते, रमेश जाधव, मिनल ढापरे, प्रा. जालींदर काशिद, रमेश पवार, विलासराव जाधव, रत्नाकर शानभाग, सुदर्शन पाटसकर, अॅड. परवेझ सुतार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विजय दिवस चौकातील विजय स्तंभास अभिवादन केल्यानंतर शोभा यात्रेस प्रारंभ झाला.

शोभा यात्रेत घोड्यावर स्वार झालेले छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी आणि मावळे, योगेश स्केटींग ऍकॅडमीचे स्केटींग करणारे विद्यार्थी, संत तुकाराम हायस्कुल, दि.का. पालकर शाळा, कासम हुसेन दानेकरी ऍग्लो उर्दु स्कुल, एच.के.डी.स्कुलसह विजय दिवस समीतीचे चित्ररथ, मराठा लाईट इंन्फंट्रीचा बेळगाव येथील बॅंण्ड, एसजीएम महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट, आदर्श विद्यार्थी, आदर्श विद्यार्थीनी सहभागी झाले होते. विजय दिवस चौकातुन उपजिल्हा रुग्णालयासमोरुन कृष्णा नाका मार्गे कन्या शाळेसमोरुन चावडी चौक, तेथुन आझाद चौक, दत्त चौकातुन पुन्हा विजय दिवस चौकात ही शोभा यात्रा नेण्यात आली. यावेळी ऍड. संभाजीराव मोहिते यांनी विजय दिवसची माहिती दिली. भरत कदम यांनी सुत्रसंचालन केले.

शस्त्रास्त्र प्रदर्शन सजले
लिबर्टी मजदुर मंडळाच्या मैदानावर शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे उदघाटन भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, तहसीलदार अमरदीप वाकडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवसेनेचे नितीन काशिद, पालिकेचे नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक सौरभ पाटील, अॅड. परवेझ सुतार यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात सैन्यदलाची जवळुन लांब मारा करणारी, जमिनीवरुन आकाशात मारा करणारी शस्त्रे, विविध बंदुका, रडार व अन्य शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. त्यातुन भारतीय सैन्यदलाच्या शस्त्र सज्जतेची चुनुकच पहायला मिळत आहे. विजय दिवस समितीची शहिदोंगी गॅलरी लावण्यात आली आहे. पहिल्या दिवसापासुनच हे प्रदर्शन पाहण्यासाठी आबालवृध्दांनी गर्दी केली आहे.

सरसनेपातींचा उलगडलाय इतिहास
छत्रपती शिवाजी महाराज यांचे सरसेनापती तळबीड हंबीरराव मोहिते यांचा जीवनपट उलगडणाऱ्या “तळबीडचा जाज्वल इतिहास’ हे दालनही प्रदर्शनस्थळी लावण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे समाधीस्थळ, त्या परिसरातील विरघळ, तळबीडची लष्करी परंपरा, ऐतिहासीक तोफ, वसंतगडाची माहिती देण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट
जेष्ठ नेत यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडणारी माहिती प्रदर्शनस्थळी लावण्यात आली आहे. तेथे चव्हाण यांचे दुर्मिळ फोटो, त्यांच्या जन्मापासुन त्यांनी राज्य, देश पातळीवर भुषवलेली विविध पदे, त्यांनी केलेले काम यासह त्यांच्या मृत्युपर्यंतचा जीवनपट उलगडणारी माहिती तेथे लावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या