
महाराष्ट्रात एवढी मोठी आपत्ती येऊनही केंद्र सरकारने फारशी मदत दिली नाही. दुसरीकडे प. बंगालला मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठय़ा प्रमाणात मदत करण्यात आली.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यानेच केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप मदत व पुनर्वसनमंत्री विजय वड्डेटीवार यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला पत्र पाठवून 1 हजार 40 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी केली होती.
राज्यात आलेले आपत्तीचे संकट पाहता मागणी करण्यात आलेल्या रकमेच्या पन्नास टक्के तरी मदत दिली जाईल अशी अपेक्षा होती, पण केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मागणीकडे दुर्लक्ष करत दुजाभाव केल्याचे वड्डेटीवार म्हणाले.
नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीसाठी प. बंगालला 1 हजार कोटींच्या वर रक्कम दिली. कर्नाटकला देण्यात आलेली मदत ही आपत्तीने झालेल्या नुकसानीपेक्षा अधिक आहे.
केवळ निवडणुका आणि भाजपशासित राज्य एवढाच निकष डोळ्यांसमोर ठेवून मदत देण्यात आल्याचे दिसून येत असल्याची टीकाही त्यांनी केली.




























































