ओबीसी उपोषणाचा प्रश्न सोडवून मग कश्मीरला जावं, मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यावर वडेट्टीवारांची टीका

मुख्यमंत्र्यांनी देश, विदेश, राज्य फिरलं पाहिजे. मात्र राज्याची परिस्थिती लक्षात घेऊन फिरलं पाहिजे. राज्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढलं आहे. मराठवाड्यात दररोज तीन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा, ओबीसी समाजाचा उद्रेक होत असताना त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 370 कलम हटविल्यानंतर मुख्यमंत्र्यांना काश्मीर आवडत असेल तर खुशाल जावं. त्या आधी उपोषण सोडवून जावं, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

मराठ्यांना ओबीसी आरक्षणात समाविष्ट करू नये, या मागणीसाठी चंद्रपुरात सुरू असलेल्या आंदोलनाला आज विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. रवींद्र टोंगे हे मागील सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. आज त्यांच्या भेटीला वडेट्टीवार आले होते. आज ओबीसी मोर्चाचे आयोजन केले गेले असून, त्यातही वडेट्टीवार सहभागी होणार आहेत. सोबत भाजप नेते आशीष देशमुख उपस्थित आहेत. आठ दिवस उलटूनही या आंदोलनाची दखल न घेतल्याने ओबीसी बांधवांत असंतोष असून, हा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.