पुन्हा उफाळला विखे-पवार वाद; सुजय विखेंचे रोहित पवारांना आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sujay-vikhe-rohit-pawar

सामना प्रतिनिधी । नगर

विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांची स्थिती पार्थ पवारांपेक्षाही वाईट करू, असा इशारा सुजय विखे यांनी दिला आहे. एकप्रकारे आगामी निवडणुकीआधी सुजय विखे यांनी रोहित पवार यांना थेट आव्हानच दिले आहे.

रोहित पवार हे कर्जत-जामखेडमधून विधानसभा निवडणूक लढकण्याची शक्यता आहे. हा तालुका नगर लोकसभा मतदारसंघातच येतो. त्यामुळे या मतदारसंघात रोहित पवार उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात सुजय विखे सक्रिय होतील याचे हे संकेत मानले जातात. 1991 मध्ये  बाळासाहेब विखे-पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांना काँग्रेसचे तिकीट नाकारले. यशवंतराव गडाख यांना उमेदवारी दिली. विखे-पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. काहीही करून विखे-पाटील यांचा पराभव झाला पाहिजे, अशी जबाबदारी राजीव गांधींनी शरद पवारांवर सोपवली. यात गडाख विजयी झाले, पण कोर्टात जाऊन विखे-पाटलांनी गडाखांची खासदारकी घालवली.

तेव्हापासून विखे- पवार वाद कायम आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे-पाटीलांसाठी नगरची जागा सोडायला शरद पवार यांनी नकार दिल्यापासून  पवार आणि विखे-पाटील यांच्यात नव्याने वाद निर्माण झाला.