
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालुक्यातील तुंगी येथील जीप माळुंब्रा गावात गैरसमजातून फोडली. त्यातील एका व्यक्तीलाही गंभीर मार लागल्यामुळे जखमी झाला याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या 15 दिवसांपासून माळकुंजी, माळुंब्रा या दोन गावात भुरट्या चोरट्याने धुमाकाळ घातला असून येथील नागरिक सध्या भितीच्या वातावरणात रात्रीचा दिवस करुन जगत आहेत. त्यातच माळुंब्र्यात गुरुवारी सायंकाळी 7 च्या सुमारास ज्ञानेश्वर चंद्रहास कदम याच्यावर अज्ञात व्यक्तीने हल्ला केला. याच वेळी फुलचंद कदम यांच्यावरही जबर हल्ला झाला होता ते त्यात थोडक्यात बचावले व चार दिवसापूर्वी वनमाला गोविंद कदम यांच्यावरही अशाच प्रकाराचा हल्ला केला होता.
मालकोंडजीतही मागील 8 दिवसापासून अज्ञात व्यक्तीने धुमाकूळ घातला आहे. मारहाण झाल्यामुळे गावातील सर्व तरुण काठ्या कुऱ्हाडी घेऊन शेतोशेत हल्लेखोरांचा शोध घेत होते. याच दरम्यान तुंगी रस्त्याने एक गाडी खूप वेगाने येत असल्याबद्द मोबाईलवर गावात माहिती मिळाली. जुन्या गावातील चौकात 10 ते 20 वयस्कर माणसे होती. त्यांनी गाडीला हात करून गाडी थांबवण्यास सांगितले पण ड्रायव्हरने भीतीने त्याच्याच अंगावर गाडी घातली. सर्वजण बाजूला झाले. गाडी तशीच पुढे नवीन गावात जात असल्याचे बघून गावकऱ्यांचा संशय बळावला व त्यांनी नवीन गावात फोन करून हाल्लेखोर नवीन गावाच्या दिशेने पांढऱ्या जीपने येत असल्याची खबर दिली.
संध्याकाळी 7 पासून दोन्ही गावातील तरुण शोधाशोध करून वैतागून गेले होते. त्यात ड्रायव्हरने वरच्या नवीन गावातही लोकांची गर्दी पाहून समाज मंदिरापासूनच गाडी मागासवर्गीय वस्तीकडे नेली पुढे रस्ता न मिळाल्याने गाडी थांबवली तेवढ्यात लोकांनी गाडीवर बेछूट दगडफेक व काठी हल्ला केले. त्यात गाडीच्या सर्व काचा फुटल्या.
गाडीत गावातीलच एक महिला व दोन लहान मुली असल्याचे पाहून लोक थांबले. ती गाडी चोरांची नसून तुंगीचे पाहुणे जुन्या गावातील कैसचिन पवार यांचे सासरे, मेव्हणे व गावचीच सून मेघा पवार असल्याचे कळले.

























































