विनायक राऊत मोठ्या मताधिक्याने विजयी होतील – प्रमोद जठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

रुसवे, अडी बाजूला ठेवून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते युतीच्या धर्माचे पालन करण्यासाठी एकवटले आहेत. कुडाळ येथे होणार्‍या भाजप विधानसभा मतदारसंघ प्रमुख पदाधिकारी मेळाव्यात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह युतीचे उमेदवार विनायक राऊत उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघातून मताधिक्य घेत राऊत बहुमताने विजयी होतील, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी व्यक्त केला.

पर्ससीनच्या मासेमारी विरोधात सरकारने अधिसूचना काढली. मात्र मत्स्य व्यवसाय खात्यातील काही अधिकारी मस्ती करताहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मच्छीमारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. खासदार राऊत यांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मच्छीमारांसोबत घडवू. असेही प्रमोद जठार यांनी सांगितले.

भाजपच्या तालुका कार्यालयात पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली. यानंतर प्रमोद जठार, राजन तेली यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रभाकर सावंत, भाऊ सामंत, तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, दीपक सांडव, पूजा करलकर, बबलू राऊत यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पारंपरिक मच्छीमारांच्या समस्यासंदर्भात तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला. त्यामुळेच पर्ससीननेटच्या मासेमारी विरोधात अधिसूचना काढण्यात आली. अधिसुचनेनंतर जी कारवाई व्हायला हवी होती ती झाली नाही याला मत्स्य व्यवसायच्या अधिकार्‍यांची मस्ती कारणीभूत आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांवर कारवाई व्हायलाच हवी.

शेतकर्‍यांप्रमाणे मच्छीमारांची खावटी तसेच अन्य योजनांवरील कर्जे माफ व्हायला हवीत, अशी आमची भूमिका आहे. मत्स्यदुष्काळाची समस्या मच्छीमार बांधवांना भेडसावत असल्याने यातून मच्छीमारांना दिलासा मिळायला हवा. यासाठी केंद्रस्तरावर स्वतंत्र मत्स्य खात्याची स्थापना करण्यात आली आहे. पारंपरिक मच्छीमार हे युतीसोबतच राहतील याची काळजी येत्या काळात घेतली जाईल, असे जठार यांनी स्पष्ट केले.

भाजप युतीच्या धर्माचे पालन करणार आहे. खरे मोदी समर्थक ही शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत आमची अधिकृत युती आहे. त्यांच्यासोबतच काम करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले आहेत. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात धनुष्यबाणालाच मत देण्याचे काटेकोरपणे पालन होईल असे त्यांनी स्पष्ट केले.

युतीचा कुडाळ-मालवण तालुक्याचा मेळावा ४ तारखेला दुपारी बारा वाजता कुडाळ येथे होणार आहे. या मेळाव्यास तालुक्यातून सुमारे दोनशे भाजपचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहतील. सामान्य माणसांचा उत्कर्ष, विकासासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी मोदीच पंतप्रधान व्हायला हवेत. या भावनेतून भाजपचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.