
विनोद तावडे यांची भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी झालेली नियुक्ती हा महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना दिलेला इशारा असल्याचे मानले जात आहे. तावडे हे अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत व फडणवीस यांच्या काळात त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न झाल्यानेच राष्ट्रीय पातळीवर त्यांचे ‘उडान’ महत्त्वाचे मानले जाते. प्रमोद महाजन यांच्यानंतर राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्त झालेले तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते आहेत.
फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तावडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तावडेंसारख्या ‘हेवीवेट’ मराठा नेत्याला उमेदवारी नाकारणे हा धक्कादायक निर्णय होता. त्यानंतरच्या काळात तावडे अडगळीत फेकले गेले होते. पक्षाच्या कार्यक्रमात ते अभावानेच दिसत. एरवी त्यांच्याभोवती असलेला मीडियाचा गराडा एकदम नाहीसा झाला. तावडेंची छबी आणि आवाज वर्तमानपत्राच्या पानांवरून आणि टीव्हीच्या पडद्यावरून गायब झाला होता. काही काळानंतर त्यांना राष्ट्रीय चिटणीसपद देण्यात आले, पण ही नियुक्ती म्हणजे फडणवीसांनी त्यांचे गाठोडे बांधून महाराष्ट्राबाहेर रवानगी केली असे बोलले जात होते, परंतु आता नव्या जबाबदारीमुळे तावडे यांचे पुनर्वसन झाले असे मानले जात आहे. तावडे यांना ही नवी जबाबदारी देऊन राजकारणात शाश्वत काहीच नसते हा संदेश पक्षाने फडणवीसांना दिला आहे अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली.
तावडे यांना नवी जबाबदारी मिळताच फडणवीस यांनी ट्विट करून त्यांचे अभिनंदन केले खरे, पण ही नियुक्ती हा फडणवीसांना मोठा ‘सेटबॅक’ आहे असे बोलले जाते. 2014 साली मुख्यमंत्रीपदाची तावडे यांची इच्छा त्यांना लपवता आली नाही इथेच फडणवीसांच्या ‘बॅडबुक’मध्ये तावडे गेले अशी भाजपच्या वर्तुळात उघड चर्चा आहे. ‘राष्ट्रीय’ सरचिटणीसपदासोबतच राज्यातील निर्णय प्रक्रियेतही तावडे यांचा सहभाग असू शकणार आहे. फडणवीसांच्या काळात राज्यातील राजकारणात दुखावलेल्या भाजपच्या जुन्याजाणत्यांना त्यांचे ऐकून घेऊन केंद्रीय नेतृत्वापर्यंत भावना पोहोचवणारा हक्काचा ‘माणूस’ सापडल्याचे मानले जात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेतृत्वाशी जिव्हाळ्याचे संबंध हाही तावडे यांचा ‘प्लस पॉइंट’ असल्याचे तावडे यांचे निकटवर्तीय सांगतात.
संयम आणि निष्ठेचे फळ!
आपल्याला संयम आणि निष्ठेचे फळ मिळाले अशी प्रतिक्रिया तावडे यांनी व्यक्त केली आहे. हाच संदेश तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास वाटतो असे सांगतानाच आपण या पदाला न्याय देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू अशी पुस्ती त्यांनी पुढे जोडली.































































