
अभूतपूर्व आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे यांनी बुधवारी राजीनामा न देताच देश सोडून मालदीवला पळ काढला. त्यामुळे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आणि हिंसक आंदोलनाचा पुन्हा मोठा भडका उडाला. सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. मात्र त्यानंतरही संतप्त आंदोलकांनी रस्त्यावरच्या लढाईतून माघार न घेता राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या कार्यालयांसह राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरही कब्जा मिळवला. या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर देशात आणीबाणी लागू करण्यात आली असून लष्कर आणि पोलिसांना आंदोलकांवर ‘आरपार’ची कारवाई करण्याचा आदेश पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी दिला आहे.
गगनाला भिडलेली महागाई, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, ढासळलेली अर्थव्यवस्था यातून देशाला सावरण्यात राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षे व पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे हे सपशेल अपयशी ठरले आहेत. सरकारच्या या अपयशाचा निषेध करीत जनतेने ऐतिहासिक बंड पुकारले आहे. गेल्या आठवडय़ात हजारोंच्या जमावाने राष्ट्रपती व पंतप्रधानांच्या कार्यालयांवर कब्जा मिळवला. सरकारने पायउतार व्हावे यासाठी आंदोलक राष्ट्रपती भवनात ठाण मांडून राहिले. गोटाबाय यांनी बुधवारी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते, मात्र तसे न करताच त्यांनी पत्नी व दोन बॉडीगार्डना सोबत घेऊन श्रीलंकेतून मालदीवला पळ काढला. ते नौदलाच्या विमानातून पळाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपतींच्या या पळपुटय़ा कारनाम्याची माहिती मिळताच हजारो नागरिकांचा जमाव रस्त्यावर उतरला आणि आंदोलनाचा पुन्हा मोठा आगडोंब उसळला. सर्व खासदार, मंत्री, नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा आणि श्रीलंकेच्या जनतेला नवीन खासदार व सरकार निवडण्याची संधी द्यावी, अशी मागणी करीत आंदोलकांनी सरकारविरोधात उग्र आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान तथा हंगामी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी आंदोलकांना रोखण्यासाठी शक्य ती सर्व प्रकारची कारवाई करण्याचा आदेश लष्कर आणि पोलिसांना दिला आहे. सुरक्षा दलांकडून अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या जात आहेत, मात्र त्यानंतरही जमाव सैरावैरा पळून उग्र आंदोलन करीत आहे. आंदोलकांवर नियंत्रण मिळवणे लष्करालाही मुश्कील बनल्याने देशातील परिस्थिती आणखी भीषण बनण्याची भीती आहे.
सनथ जयसूर्याचे सरकारवर जोरदार टीकास्त्र; श्रीलंकेची वाताहत नेत्यांमुळे उडालीय!
भीषण आर्थिक संकटात होरपळलेल्या श्रीलंकेच्या सध्याच्या दुर्दशेला देशातील नेते जबाबदार असल्याचा आरोप माजी क्रिकेटपटू सनथ जयसुर्याने केला आहे. श्रीलंकेची वाताहत सरकार आणि राजकीय नेत्यांमुळे उडाली आहे. देश अत्यंत वाईट अवस्थेत आहे. याला सर्वस्वी नेते जबाबदार आहेत. त्यामुळे संतप्त होऊन हजारो लोक राष्ट्रपती भवनमध्ये घुसले. यात चुकीचे काहीच नाही, अशा शब्दांत जयसुर्याने बुधवारी सरकारविरोधी संताप व्यक्त केला. श्रीलंकेतील सध्याच्या परिस्थितीवर जयसुर्याने बुधवारी वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, श्रीलंका सध्या ज्या परिस्थितीत आहे, ती अत्यंत वाईट स्थिती आहे. लोकांना एका-एका गोष्टीसाठी भली मोठी रांग लावावी लागत आहे. देशात ना वीज, ना तेल. एवढेच नव्हे तर आजारी पडलेल्या नागरिकांसाठी औषधेही नाहीत. यापेक्षा आणखी वाईट काही असू शकत नाही, असे त्याने म्हटले आहे.
दिवसभरातील घडामोडी
- पंतप्रधानांचे कार्यालय आणि निवासस्थानावर हजारो आंदोलकांचा मोर्चा धडकला. नंतर संतप्त जमाव राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या कार्यालयात घुसला आणि आंदोलकांनी तेथील प्रसारण बंद पाडले.
- जमावाला पांगवण्यासाठी लष्कर व पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या तसेच हवेत गोळीबारही केला. यावेळी धुराचा त्रास होऊन 26 वर्षीय तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला.
- परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर संसदेच्या सभापतींनी सर्व पक्षांची तातडीची बैठक बोलावली.
- कोलंबो येथील अमेरिकन दूतावासाने पुढील दोन दिवसांसाठी आपली सेवा स्थगित केली आहे.
पंतप्रधान विक्रमसिंघे काळजीवाहू राष्ट्रपती
गोटाबाय राजपक्षे यांनी देशाबाहेर पळ काढल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळून श्रीलंकेत प्रचंड अराजकता माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदेचे सभापती महिंदा एबेवारदाना यांनी बुधवारी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून निवड केली. नवीन राष्ट्रपतींची 20 जुलैला निवड होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत विक्रमसिंघे हेच पंतप्रधानपदासह राष्ट्रपती म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत. देशातील भीषण हिंसाचार रोखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे उभे ठाकले आहे.

























































