तर आता तू मला शिकवणार, कोहली-गंभीर राड्यातील सत्य आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या राड्याने हिंदुस्थानी क्रिकेटपटूंमधील वाद मैदानावर आणले, त्या कोहली-गंभीर यांच्यातील वादग्रस्त बाचाबाची आता समोर आलीय. या लढतीत विराट कोहलीचे नवीन-उल-हकशी बिनसले होते तर सामना संपल्यानंतर गंभीरशीही बाचाबाची झाली. या सामन्यात बंगळुरू विजयासमीप पोहोचताच कोहली अधिकच आक्रमक झाला होता. या वादानंतर हिंदुस्थानी क्रिकेट आणि प्रसारमाध्यमांमध्ये दोन गटही पडल्याचे दिसले. तसेच चाहत्यांनीही दोघांचे समर्थन आणि दोघांवरही टीका केल्याचेही दिसले.

त्यामुळे हा वाद झाल्यानंतर मैदानात नक्की काय घडले याबाबत सर्वानाच उत्सुकता लागली होती. तेव्हा या राड्याच्या वेळी उपस्थित असलेल्या व्यक्तिने नेमकं काय घडलं ते सांगितलं

शिव्यांची सुरुवात तुम्ही का केली ?

सामना संपल्यानंतर विराट सर्वांची हस्तांदोलन करत होता तेव्हा मायर्स विराटला काही विचारत होता, ते सर्वांना दिसलं असेलच. पण तेव्हा मायर्सने कोहलीला विचारले, तू आमच्या संघाला वारंवार शिव्या का घालत आहेस ? विराटने उत्तर दिले, शिव्यांची सुरूवात तुम्ही का केली आणि तू माझ्याकडे सारखा का पाहात होतास ? याआधी अमित मिश्राने पंचांकडे विराट हा नवीन-उल-हकला शिव्या देत असल्याची तक्रार केली होती.

तू माझ्या कुटुंबाला शिव्या घातल्यास…

कोहली मायर्सशी बोलत होता तेव्हा गंभीरला वाटले की वाद आणखी वाढेल, म्हणून त्याने मायर्सला आपल्याकडे खेचून बाजूला नेले. तु त्याच्याशी वाद घालू नकोस, असेही गंभीर मायर्सला म्हणाला. यानंतर विराट काही पुटपुटला तेव्हा गंभीर आणि कोहलीमध्ये बाचाबाची सुरू झाली. गंभीर कोहलीला म्हणाला, तू काय बोलतोस ? तेव्हा विराट म्हणाला, मी तुम्हाला काही बोललो नाहीय, मग तुम्ही कशाला या वादात पडताय ? तेव्हा गंभीर म्हणाला, जर तू माझ्या खेळाडूला शिव्या घातल्या असशील तर त्याचा अर्थ तू माझ्या कुटुंबाला शिव्या घातल्या आहेस. तेव्हा विराट म्हणाला, तुम्ही आपल्या कुटुंबाला सांभाळून ठेवा. यानंतर दोघांना वेगळे केले जाते तेव्हा गौतम विराटला म्हणाला, तर आता तू मला शिकवणार. गौतमचा हा स्वर फारच गंभीर होता. कारण याच गंभीरने विराटच्या प्रारंभीच्या काळात दिल्लीकडून रणजी खेळताना त्याला अनेकदा प्रोत्साहन दिले होते. तसेच विराटच्या पहिल्या शतकी खेळीला संस्मरणीय करण्यासाठी गौतमने आपला सामनावीर पुरस्कारही विराटला बहाल केला होता. श्रीलंकेविरुद्धच्या त्या वनडेत दोघांनी 224 धावांची भागी केली होती. विराट 107 धावांवर बाद झाला होता तर गंभीरने नाबाद 150 धावा केल्या होत्या.