
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि विश्वचषक स्पर्धा म्हणजे मोठे आव्हान याचे भान टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूने ठेवायला हवे. एकटा कर्णधार विराट कोहली अथवा एक-दोन खेळाडू खेळून आपल्याला जिंकता येणार नाही. विश्वचषक पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येक क्रिकेटपटूने जीव तोडून खेळ करायला हवा. अन्यथा विश्वचषकावर तिसऱयांदा नाव कोरण्याचे आपले स्वप्न स्वप्नच राहील, अशा शब्दांत हिंदुस्थानचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने टीम इंडियाच्या अन्य स्टार खेळाडूंचे कान टोचले आहेत.
‘टीम इंडियातील एखाद्दुसरा स्टार खेळाडू प्रत्येक लढतीत चमकदार खेळ करणार हे निश्चित, पण तेवढय़ाने प्रत्येक सामना जिंकता येत नाही. संघातील 11 खेळाडूंनी आपापले योगदान दिले तरच संघ विजयी होतो. नाही तर मग 1996, 1999 आणि 2006 च्या आयसीसी विश्वचषकाप्रमाणे माझ्यासारखीच विराटची अवस्था होईल. त्यावेळी मला अन्य सहकाऱयांची साथ लाभली असती तर टीम इंडियाची कामगिरी नक्कीच चमकदार जली असती’, असे सचिन म्हणाले.
दोन नवे चेंडू आणि इंग्लंडच्या सपाट खेळपट्टय़ा प्रत्येक गोलंदाजांचा जीव काढणार आहेत. त्यामुळे प्रत्येक संघाला विजयाच्या आशा कायम राखण्यासाठी किमान 300 धावांचा टप्पा गाठावाच लागेल याचे भान टीम इंडियाच्या फलंदाजांना ठेवावे लागणार आहे.
– सचिन तेंडुलकर



























































