पुलवामा हल्ल्यात व्हर्च्युअल सीमचा वापर, सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी अमेरिकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करण्यासाठी व्हर्च्युअल सीमचा वापर वापर करण्यात आला होता. या व्हर्च्युअल सीमसाठी सर्व्हिस प्रोव्हायड करणारी कंपनी ही अमेरिकेतील असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. दरम्यान, या कंपनीची माहिती हिंदुस्थानने अमेरिकेकडे मागितली आहे.

जैश-ए-मोहम्मदने पुलवामा हल्ल्याचा कट तडीस नेण्यासाठी व्हर्च्युअल सीमचा वापर केला होता. सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर स्फोटके असलेली गाडी धडकवणारा दहशतवादी आदिल दर आणि त्रालमधील हल्ल्याचा सूत्रधार मुद्दसर खान हाही व्हर्च्युअल सीम वापरत होता, अशी माहिती समोर आली आहे.

हल्ल्याची मोडस ऑपरेंडी
जैशचे दहशतवादी आणि पाकव्याप्त कश्मीरमधील त्यांचे म्होरके यांच्यातील संभाषण या व्हर्च्युअल सीमच्या माध्यमातून सुरू असते. पुलवामा हल्ल्यावेळी आदिल दर, मुद्दसर खान आणि पाकिस्तानमधील म्होरके एकमेकांच्या सतत संपर्कात होते.

व्हर्च्युअल सिम कसे काम करते?
अमेरिकेतील सर्व्हीस प्रोव्हायडरच्या मदतीने व्हर्च्युअल सिम तयार केले जाते.
यात कॉम्प्युटर एक फोन नंबर तयार करतो. या सर्व्हीस प्रोव्हायडरच्या वेबसाईटला जाऊन ते अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यात येते.
हा नवीन नंबर व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामसह कोणत्याही सोशल मीडियासाठी वापरला जाऊ शकतो. याच साईटवरून व्हेरिफिकेशन कोड तयार केला जातो. तो तयार केला की, एखादी व्यक्ती तिचा वापर करू शकते.