
>> विवेक दिगंबर वैद्य
ब्रह्मगिरी पर्वत आध्यात्मिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा व पौराणिक संदर्भ राखलेला आहे. येथील रामकुंडावर साक्षात प्रभूरामचंद्र यांनी श्राद्धविधी केल्याचे सांगितले जाते. ब्रह्मगिरी पर्वताला समग्र प्रदक्षिणा घालण्यासाठी 32 कि.मी. लांबीचा खडतर मार्ग आक्रमावा लागतो.
या प्रदक्षिणा मार्गावर रामतीर्थ, नृसिंहतीर्थ आणि प्रयागतीर्थ अशी तीन कुंडे आहेत. अनेक भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना दिसतात. 1800 फूट इतकी उंची लाभलेला ब्रह्मगिरी साक्षात ब्रह्मदेवाचे ‘रूपक’ मिरवीत उभा ठाकलेला आहे. प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी हा पर्वत आणि येथील आल्हाददायक निसर्गरम्य आसमंत प्रत्यक्ष चढाई करून पाहणे गरजेचे आहे.
एकदा काही कारणाने ब्रह्मदेव आणि श्रीशंकरामध्ये भांडण झाले. वाद विकोपाला गेला तेव्हा शिवाने ब्रह्मदेवांना शाप दिला, ‘तू पर्वत होऊन पृथ्वीवर वास्तव्य करशील.’ त्यावर क्रोधित झालेल्या ब्रह्मदेवाने श्रीशंकरास प्रतिशाप दिला की, ‘मी जिथे पर्वतरूपाने स्थिर होईन तिथे तुला माझ्या सन्निध राहावे लागेल.’ ही देववाणी पूर्ण होण्यास अवकाश तो किती लागावा? ब्रह्मदेव तत्काळ नाशिक परिसरात ब्रह्मगिरी पर्वताच्या रूपाने स्थिर झाले व त्यांच्या सन्निध श्रीशंकरांना ‘त्र्यंबकेश्वर’ रूपाने वास्तव्य करावे लागले. ब्रह्मगिरी आणि त्र्यंबकेश्वर यांच्या उत्पत्तीच्या अनुषंगाने ही कथा प्रचलित असली तरी ब्रह्मगिरी पर्वत शिखराचे माहात्म्य सांगण्यास पुरेशी आहे.
ब्रह्मगिरी पर्वताचा अनुभव घेण्यासाठी इथे बांधलेल्या दगडी पायऱयांची साथ लाभते. श्रीज्ञानेश्वरांचे बंधू व गुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्र्यंबकगडाकडे जाताना कातळात कोरलेला पाच फूट उंचीचा हनुमंत व एकमुखी दत्ताचे दर्शन प्रथम घडते. फारसा वापरात आणि प्रचलित नसलेला त्र्यंबकगड तेराव्या शतकात देवगिरीच्या राजाच्या अधिपत्याखाली होता. बहामनी राज्याच्या विभाजनानंतर हा गडकिल्ला अहमदनगरच्या निजामशहाकडे गेला. पुढे किल्ल्याची मालकी शहाजीराजे, शहाजहान, शिवकाळात मोरोपंत पिंगळे यांच्याकडे तिथून पुढे औरंगजेब, शाहूराजे, कोळीबांधव, निजाम, नानासाहेब पेशवे व सरतेशेवटी इंग्रजांकडे आली. या कारणाने अनेक स्थित्यंतरे पाहिलेला त्र्यंबकगड त्यातही बिकट वहिवाटीच्या रस्त्याला असल्यामुळे फारसा स्मरणात राहिला नाही.
त्र्यंबकगडाचा बालेकिल्ला, कडेलोट स्थान, खिंड पार करून पश्चिम दिशेला उतरले की पुरातन घडीव दगडी बांधणीचे शिवमंदिर दिसते. या छोटेखानी मंदिरातील लहानशा पुंडामधील ज्या गोमुखातून पाण्याची संततधार पडत असे ते इथल्या गंगेचे उगमस्थान आहे. हे गंगेचे मूळ प्रकटस्थान मानले जाते. येथे गंगागोदावरी मातेची काळय़ाशार पाषाणातील मूर्ती असून पुंडानजीक शिवलिंग स्थापित आहे. येथे श्रीगौतम ऋषींनी पैक वर्षे श्रीशिवशंकराचे पूजन व आराधना केली होती म्हणून या गंगेचा उल्लेख गौतमीगंगा असाही केला जातो. बाहेर दगडी मंडपामध्ये श्रीगौतमऋषींची पत्नी गौतमीसह मूर्ती स्थापित आहे. येथून जवळच श्रीचक्रधरस्वामींचेही मंदिर आहे.
खालच्या बाजूस पश्चिम पठारावर श्रीशंकराने जिथे आपल्या जटा आपटल्या ते स्थान आहे. येथे पूर्वी श्रीगौतमऋषींचा आश्रम होता. ऋषीमहोदय दररोज स्नानास जातेवेळी मुखाने मंत्रोच्चारण करीत जाण्याच्या मार्गावर धान्य पेरत असत. ते स्नान करून माघारी परतेपर्यंत धान्यांच्या दाण्यातून तयार झालेले पीक आपल्या आश्रमात नेत असत. काही काळानंतर गाईचे रूप धारण करून तिथे आलेल्या जया नामक महाउपद्रवी असुराने श्रीगौतमऋषींच्या शेतीचे, धान्याचे अतोनात नुकसान केले तेव्हा ऋषींनी दर्भ अभिमंत्रित करून त्या गायरूपी जयासुरावर टाकताच तो गतप्राण झाला. जयासुर जरी मेला तरी तो गाईच्या रूपात असल्याने श्रीगौतमऋषींना गोहत्येचे पातक लागले. तेव्हा, या पातकातून मुक्त होण्यासाठी त्यांनी श्रीशंकराची कठोर तपश्चर्या केली. त्यांच्या तपाचरणाचे फळ देण्यासाठी श्रीशंकर भूतलावर अवतरले आणि त्यांनी ऋषींना ‘वर’ मागण्यास सांगितले. श्रीगौतमऋषींनी गोहत्या पातकापासून मुक्त होण्यासाठी परमपावन गंगाजलाची मागणी केली. त्यावर श्रीशंकराने ‘तथास्तु’ म्हटले; परंतु गंगादेवी काही केल्या श्रीशंभूमहादेवाच्या जटासंभारातून खाली उतरण्यास तयार होईना. खडतर तपश्चर्या करून आपणास वश करणाऱया भक्तश्रेष्ठाची इच्छापूर्ती करण्यात गंगामातेच्या अनिच्छेमुळे विघ्न येत असल्याचे पाहून श्रीशंकर क्रोधित झाले आणि त्यांनी आपल्या जटा इथल्या सपाट कातळावर आपटल्या. त्यामुळे गंगा जटाबंधमुक्त होऊन प्रकट झाली आणि श्रीगौतमऋषींनी केलेल्या ‘जय गंगे, हर गंगे’च्या उच्चारवात तिथे खळखळा वाहू लागली.’ हा प्रसंग माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सोमवारी घडला म्हणून पुढे दरवर्षी या विशिष्ट तिथीला येथे गंगावतरण उत्सव संपन्न होतो. ज्या दगडावर श्रीशंभू महादेवांनी जटा आपटल्या तो रेषायुक्त दगड आजही पाहावयास मिळतो. या स्थानाच्या नजीकच श्रीब्रह्मगिरीचे मुख्य मंदिर आहे.
येथून खाली उतरून डाव्या बाजूस गेल्यावर गंगाद्वार लागते. या गुहासदृश जागेपाशी बांधलेल्या मंदिराच्या गोमुखातून पुन्हा एकदा गंगेचा खळखळता ओघ आपल्या दृष्टीस पडतो. गौतमगंगा या स्थानावर श्रीशंकराच्या जटा आपटण्यामुळे प्रकट झालेली गंगा पुन्हा एकदा थोडय़ा दूर अंतरावर गंगाद्वार येथे दुसऱयांदा प्रकट होते आणि या तिच्या प्रवासातील तिसरा टप्पा पर्वतपायथ्याशी कुशावर्त तीर्थ येथील गोमुखातून पुन्हा प्रकट झालेला आपल्याला दिसून येतो. श्रीगौतमऋषींच्या तपश्चर्येमुळे श्रीशंकराच्या जटांतून मुक्त होत प्रकट झालेल्या गंगास्थानाला ‘गंगोत्री’ म्हणून संबोधण्यात येते, तर गंगाद्वाराकडे प्रकट होणारी गंगा ‘निम्न गोदा’ म्हणून ओळखली जाते. येथून नजीकच श्रीकोलंबिकामातेचे मंदिर आहे आणि तिथून पुढे उत्तर दिशेस नाथसंप्रदायातील सत्पुरुष श्रीगोरक्ष-गहिनीनाथांच्या गुंफा नजरेस येतात. येथे नाथसत्पुरुषांनी कठोर तपसाधना केली होती. श्रीगहिनीनाथांचे हे वास्तव्यस्थान पुरातन व जागृत आहे.
ब्रह्मगिरी पर्वत आध्यात्मिकदृष्टय़ा अतिशय महत्त्वाचा व पौराणिक संदर्भ राखलेला आहे. येथील रामकुंडावर साक्षात प्रभूरामचंद्र यांनी श्राद्धविधी केल्याचे सांगितले जाते. ब्रह्मगिरी पर्वताला समग्र प्रदक्षिणा घालण्यासाठी 32 कि.मी. लांबीचा खडतर मार्ग आक्रमावा लागतो. या प्रदक्षिणा मार्गावर रामतीर्थ, नृसिंहतीर्थ आणि प्रयागतीर्थ अशी तीन पुंडे आहेत. अनेक भाविक ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालताना दिसतात. 1800 फूट इतकी उंची लाभलेला ब्रह्मगिरी साक्षात ब्रह्मदेवाचे ‘रूपक’ मिरवीत उभा ठाकलेला आहे. प्रत्येक भक्ताने आयुष्यात एकदा तरी हा पर्वत आणि येथील आल्हाददायक निसर्गरम्य आसमंत प्रत्यक्ष चढाई करून पाहणे गरजेचे आहे.





























































