
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे पुढील वर्षी आपल्या पदावरून पायउतार होण्याची शक्यता आहे. एका गंभीर आजाराने ग्रासल्याने ते राजीनामा देणार असल्याचं वृत्त आहे.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मॉस्कोचे राजकीय तज्ज्ञ वेलेरी सोलोवी यांनी द सन या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. पुतीन यांची 37 वर्षीय प्रेयसी अलीना काबेवा आणि त्यांच्या दोन मुली त्यांना हे पद सोडण्यासाठी सांगत आहेत, असंही सोलोवी म्हणाले आहेत.
पुतीन यांच्यावर त्यांच्या कुटुंबाचा पुष्कळ पगडा आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देऊन आपल्या आरोग्याकडे लक्ष केंद्रित करावं अशी त्यांच्या निकटवर्तीयांची इच्छा आहे. त्यामुळे पुतीन यांची प्रेयसी आणि त्यांच्या दोन मुली त्यांना राजीनाम्याविषयी सुचवत आहेत.
सोलोवी यांच्या माहितीनुसार, पुतीन यांना पार्किन्सन हा आजार आहे. काही काळापूर्वीच त्यांना या आजाराची लक्षणं दिसू लागली आहेत. पुतीन यांच्या पायात सातत्याने कंप जाणवतो. हे या आजाराचं एक मोठं लक्षण आहे.
काही व्हिडीओजमध्ये पुतीन यांची बोटंही कापत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुढील वर्षी पुतीन पदाचा राजीनामा देऊ शकतात. पुतीन यांचं वय 68 वर्षं असून त्यांनी 7 मे 2000 रोजी रशियाचं राष्ट्रपतीपद सांभाळलं होतं तसेच ते रशियाचे पंतप्रधानही राहिले आहेत.






















































