
सामना ऑनलाईन । मुंबई
2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी काही महिन्यांचा अवधी बाकी आहे. यासाठी कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांनी कंबरही कसली आहे. या पार्श्वभूमीवर एक लग्नपत्रिका व्हायरल होत आहे. आहेर आणण्याऐवजी मोदींना मत द्या असे जाहीर आवाहन या पत्रिकेत करण्यात आले आहे.

मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत असतात. परंतु एका सामान्य कुटुंबाने आगामी लोकसभेत मोदींना मत देण्याचे आवाहन लग्नपत्रिकेत केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ‘२०१९ च्या लोकसभा निवडणूकीत मोदींना मत द्या हेच आमच्यासाठी तुमच्याकडून भेटवस्तू असेल’ असे पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. ही लग्नपत्रिका सूरतच्या एका दांपत्याची असल्याचे पत्रिकेत दिसत आहे. वधूचे नाव जया असून वराचे जय असे आहे. त्यांचे लग्न १ जानेवारी रोजी संपन्न झाले सध्या ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.


























































